बंद्यांना रोजगारक्षम होण्याकरिता प्रशिक्षण

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

तळोजा मध्यवर्ती कारागृह हे सन 2008 पासून कार्यान्वित आहे. मुंबई विभागामधील हे तिसरे मध्यवर्ती कारागृह आहे. या कारागृहाची अधिकृत बंदी क्षमता 2124 असून सद्यस्थितीत 2722 बंदी दाखल आहेत. कारागृहात बंद्याना नैराश्याचा सामना करावा लागू नये व कारागृहात दाखल झाल्यावर त्याचे समाजाशी असलेले नाते संपुष्टात येवू नये याकरीता शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. बंदी कारागृहात दाखल झाल्यानंतर त्याचे भवितव्य धोक्यात आल्याची भावना निर्माण होऊ नये, त्याची कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर स्वतःला रोजगारक्षम होण्याकरिता बुधवारी (दि.13) मे रोजी कौशल्य विकास, उद्योजकता आयुक्तालय, कोकण भवन, नवी मुंबई यांचे मार्फत तळोजा कारागृहात टू व्हीलर मेकॅनिक, बागकाम व नर्सरी यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेवून बंद्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. या दोन्ही अभ्यासक्रमामध्ये 30-30 विद्यार्थांनी सहभाग नोंदवून प्रशिक्षण पूर्ण केले. सदरच्या प्रशिक्षणाचे पूर्ततेनंतर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, महाराष्ट्र राज्य आयुक्त अमित सैनी यांच्या यांचे हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. सदर कार्यक्रमास कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ, सचिन जाधव, अमिता पवार, मंगेश डफळे व कारागृह उपअधीक्षक जितेंद्र काळे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी राहुल झुटाळे, सचिन झिंजुर्डे व सुनिल वाघचौरे उपस्थीत होते.

Exit mobile version