तालुक्यातील 223 शिक्षक सहभागी
| खरोशी | वार्ताहर |
राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने शिक्षकांच्या क्षमतावृद्धीसाठी निवडक विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन पेण पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील 108 प्राथमिक व 115 माध्यमिक अशा 223 शिक्षकांसाठी के.ई.एस.लिटिल एंजल स्कूल पेण येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन पेण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अरुणादेवी मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
शासकीय आणि खासगी अनुदानित शाळेतील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील पहिली ते बारावीत शिकवणार्या शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले असून, या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राज्य अभ्यासक्रम आराखडा, पायाभूत स्तर, शालेय शिक्षण प्रक्रिया, क्षमता आधारित मूल्यांकनाची कार्यनीती प्रश्न निर्मितीचे प्रकार, क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य उच्चस्तरीय विचार प्रवर्तक प्रश्न शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासक आराखडा यासारख्या विविध घटकांचा समावेश करण्यात आला असून, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शासकीय आणि खासगी अनुदान शाळेतील पहिली ते बारावीच्या सर्व शिक्षकांचे सक्षमीकरण करणे हा एकच उद्देश असल्याचं प्रशिक्षणाच्या वेळी सांगण्यात आले.
यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शनाचे काम जितेंद्र म्हात्रे, अशोक जेडगुळे, लालू खामकर, प्रवीण मगर, राजू चव्हाण, हरित शिरगावकर, हेमांगी मनकावले, संध्या मोहिते या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व पेण पंचायत समिती समन्वयक आणि व्यवस्थापक निलेश मानकवले, पुरुषोत्तम म्हात्रे, हितेंद्र म्हात्रे, करुणा भोईर, हर्षला शेडगे यांनी व्यवस्था केली होती.
उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवण्यासाठी शैक्षणिक लाटेत सामील होऊन आपण संस्कारक्षम पिढी तयार करून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी नवीन ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग होईल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मिळणार्या प्रशिक्षणाचा आनंद लुटा व ज्ञानाची शिदोरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून शाळेत आलेला मुलगा शिकला पाहिजे व टिकला पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अरुणादेवी मोरे,
गटशिक्षणाधिकारी