| रोहा | प्रतिनिधी |
महिलांच्या हाताला रोजगार मिळावे व महिला स्वावलंबी होण्यासाठी छोटासा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने बँकेच्या वतीने महिलांना संधी देण्यात आली. दमखाडी गावातील बचत गटात सहभागी असणाऱ्या महिलांना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोहा शाखेकडून व्यावसायिक कर्ज मिळण्याची संधी उपलब्ध झाल्याने बचत गटातील 35 महिलांना मोमोज बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
रोहा अष्टमी नगरपरिषदच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहात छोटेखानी कार्यक्रम पार पडला. आपल्या संसारात हातभार लावण्यासाठी महिला आपले छोटे-मोठे व्यवसाय सुरु करतात. अशा कष्टाळू आणि मेहनती महिलांना व्यवसाय करण्यासाठी कुठलीही मदत लागली तर ती मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी दिले. बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देणे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी बँकेने खारीचा वाटा उचलून बँक कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे मत आरडीसी बँकेचे संचालक गणेश मढवी यांनी व्यक्त केले. यावेळी आरडीसी बँकेचे रोहा शाखेचे मॅनेजर राजेंद्र जंगम, सभापती महेश कोलाटकर, नगरसेविका संजना शिंदे, नीता कोलाटकर व दमखाडी येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





