राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त प्रशिक्षण

| सोगाव | वार्ताहर |

राष्ट्रीय जंतनाशक दिन 13 फेब्रुवारी म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणार्‍या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्षातून फेब्रुवारी व ऑगस्ट महिन्यात जंतनाशक गोळी 1 ते 19 वयोगटातील मुलामुलींना देण्यात येते.

या जंतनाशक दिनानिमित्त शनिवारी (दि.10) अलिबाग तालुक्यातील पेढांबे येथे आरोग्य विभाग, रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र पेढांबे येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्ताने प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. यावेळी जंतनाशक मोहीम यशस्वी करण्यासाठी तसेच या मोहिमेतून एकही मूल वंचित राहू नये याची माहीती प्रशिक्षणात देण्यात आली.

या प्रशिक्षण शिबिरात पेढांबे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती पाटील, आरोग्य सहाय्यक गणेश गायकवाड व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व प्राथमिक आरोग्य केंद्र, पेढांबे परिक्षेत्रातील सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version