| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मध्य रेल्वेच्या पनवेल ते कळंबोळी विभागात एका मालगाडीचे पाच डबे रेल्वे रुळांवरुन खाली घसरल्याची घटना शनिवारी (30) घडली होती. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, मेल-एक्सप्रेस गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं होतंत्र लांब पल्ल्याच्या पाच एक्स्प्रेस यामुळं खोळंबल्या असल्याची, रेल्वे विभागाकडून ही माहिती देण्यात आली. मात्र रविवारी हा मार्ग पुर्ववत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. त्यानंतर पनवेलकडून दिवा स्थानकाकडे गाड्या रवाना झाल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 3 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास पनवेलहून वसईकडे जाणारी मालगाडी रेल्वे रुळावरून घसरली. यामध्ये चार वॅगन आणि ब्रेकव्हॅन असे पाच डबे रेल्वे रुळावरून घसरल्यानं पनवेल ते कळंबोळी विभागातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
या अपघाताचा परिणाम कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांवर झाला. मार्ग ठप्प झाल्यामुळे एक्स्प्रेसमधील प्रवाशांना तासन्तास रेल्वेत बसून रहावे लागले. परिणामी, प्रवाशांच्या नातेवाईकांसह स्थानिकांनी ही आक्रमक भुमिका घेत सरकारला चांगलेच धारेवर धरले. 24 तासांच्या अथक प्रसत्नानंतर हा मार्ग सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले.