गद्दारांना ठेचून काढायचंच; शेकाप सरचिटणीस जयंत पाटील कडाडले

पुढील काळ शेकापसाठी पोषक


| पंढरपूर । विशेष प्रतिनिधी ।

शेकाप हा कार्यकर्ता घडविणारा कारखाना आहे, असे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण नेहमीच म्हणायचे. आजपर्यंत शेकापने अनेक कार्यकर्त्यांना मोठे केले. मोठ मोठ्या पदांची जबाबदारी विश्‍वासाने दिली. आज तेच कार्यकर्ते शेकाप लहान पक्ष आहे, असं म्हणत आहेत. भाजपच्या पुढे नमतं घ्या असं सांगत पक्ष सोडून, तत्त्व सोडून दुसर्‍या पक्षात प्रवेश करत आहेत, अशांना ठेचून काढू, अशी संतप्त प्रतिक्रिया शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केले. पंढरपूर येथे शेकापचे 19 वे अधिवेशन सुरु असून, या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी जयंत पाटील यांनी आपल्या तडाखेबंद, जोषपूर्ण भाषणातून उपस्थित कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा दिली. पुढील काळ शेकापक्षासाठी पोषक असणार आहे. आपल्याला पुन्हा खंबीरपणे उभे राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी 24 तास पक्षाचे काम करायचे आहे, अशी भावनिक सादही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना घातली. उद्याची पहाट ही आपलीच असणार आहे. आपल्याला उत्तुंग भरारी घेऊन शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा डौलाने फडकवायचा आहे, असा विश्‍वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.



यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ. दिपांकर भट्टाचार्य, भारतीय कम्युनिष्ट पक्ष सचिव कॉ. डॉ. उदय नारकर, कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे, लाल निशाणी पक्ष जनरल सेके्रटरी कॉ. भीमराव बनसोड, सत्यशोधक कम्युनिष्ट पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. किशोर ढमाले, समाजवादी पार्टीचे सरचिटणीस प्रताप होगाडे, माजी आ. संपतबापू पवार पाटील, माजी आ. पंडित पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, प्राध्यापक एस.व्ही. जाधव, शेकाप कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड. राजेंद्र कोरडे, स्वागताध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, रायगड बाजार चेअरमन नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, जि.प. माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, माजी सदस्या भावना पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, वृषाली ठोसर, संजना कीर, अनिल चोपडा, वैशाली पाटील, प्रिया वेलणकर, जि.प. माजी सदस्य संजय पाटील, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा चिटणीस, तालुका चिटणीस, शेकापच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व तरुण मंडळी उपस्थित होते.

यापुढे जयंत पाटील म्हणाले की, दिपांकर भट्टाचार्य हे उद्याच्या डाव्या विचारसरणीचा आशेचा किरण आहे. आज खर्‍या अर्थाने गोरगरीब, तळागाळातील जनतेला एकत्र करण्याचे काम भट्टाचार्य करीत आहेत. त्यांनी बिहारमध्ये 12 आमदार आणि 2 खासदार निवडून आणण्याचे काम केले आहे. जातीयवादावर मात करुन त्यांनी हे काम केले आहे. आपल्यालाही भविष्यात असे काम करायचे आहे. शून्यातून विश्‍व निर्माण करण्याची ताकद शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. उद्याची पहाट आपलीच आहे. अंधःकार दूर करून आपल्याला लाल बावटा डौलाने फडकवायचा आहे.

जयंत पाटील यांनी सांगितले की, 1948 मध्ये जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचे पहिले अधिवेशन झाले. पुढील वाटचालीचा आराखडा या अधिवेशनातूनच तयार करण्यात आला. वैचारिक बैठकीतून कार्यकर्ता निर्माण होणारे लिखाण या अधिवेशनामध्ये झाले. कष्टकरी, शेतकरी, गोरगरिबांच्या होणार्‍या गळचेपीला रोखण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना याच ठिकाणी करण्यात आली. या देशामध्ये शेतकर्‍यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, उद्योगधंद्यांना भाव मिळावी, ही शेतकरी कामगार पक्षाने पहिली मागणी केली होती. त्यावेळी अनेक कमी थट्टा केली. शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या चळवळीची, निर्णयाची व कामाची नोंद महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला घ्यावी लागली. शेतकरी कामगार पक्षाचा विचार घेऊनच आज देश चालवला जात आहे. 1966 ला पक्षाचे आठवे अधिवेशन झाले. एक ऐतिहासिक अधिवेशन म्हणून ते ठरले. सध्या देशात व राज्यात राजकारण वेगळ्या पद्धतीने चालत आहे. राजकारण खालच्या दर्जावर जाऊ लागले आहे. शेतकरी कामगार पक्ष संपला असे अनेकजण म्हणतात, पण शेकाप हा चळवळीतून व संघर्षातून निर्माण झालेला पक्ष आहे. त्यामुळे पक्ष कधीही संपणार नाही याची जाणीव थट्टा करणार्‍यांना कायमच असावी.

पुढील काळ शेतकरी, कष्टकरी, कामगार व बहुजनांसाठी चांगला असणार आहे. पुढील काळामध्ये राज्यात बहुजनांचे राज्य येणार आहे. या देशात पुन्हा एकदा कष्टकर्‍यांचा लाल बावटा घेऊन देशावर राज्य केले जाणार आहे. आपण खिचडीला असतो तरी चळवळ बंद केली नाही. जनतेचे प्रश्‍न सोडवण्याचे काम आजही केले जात असून, आपल्या पक्षाची बांधिलकी गोरगरिबांची कष्ट करायची कायमच राहिली आहे. कार्यकर्त्यांनो, पुढील काळ शेकापक्षासाठी पोषक असणार आहे. आपल्याला पुन्हा खंबीरपणे उभे राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी 24 तास पक्षाचे काम करायचे आहे, अशी भावनिक साद शेकाप नेते माजी आमदार जयंत पाटील यांनी दिली. उद्याची पहाट ही आपलीच असणार आहे. आपल्याला उत्तुंग भरारी घेऊन शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा डौलाने फडकवायचा आहे, असा विश्‍वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

आपण इंडिया आघाडी, महाविकास आघाडीतच राहणार आहोत. येत्या काळात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे. यासाठी जोमाने काम करायचं आहे. तसेच यापुढे कार्यकर्ते घडविण्याचे कामही करायचं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिल्लीत जावं लागलं आहे. मोठी राजकीय घडामोड सध्या सुरु आहे. त्यामुळे त्यांना येणं शक्यता झालं नसल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

सध्याच्या परिस्थितीत कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलले जात आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी वेशांतर केल्यासारखे पक्षांतर करुन महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली आहे. दिल्लीत धनशक्तीपुढे नाक घासणारे आपले राज्यकर्ते आहेत. म्हणून बजेटमध्ये महाराष्ट्रावर अन्याय होत आहे. आज तामिळनाडू, बिहारवर सरकारने अमाप खर्च केला आहे. मात्र, केवळ पाठिंबा दिल्यामुळे नेत्याला खुश करण्यासाठी दिलेला हा मलिदा आहे. जनतेला त्याचा कोणताही फायदा होणार नाही. आगामी निवडणुकीत या नीतीभ्रष्ट सरकारला जनताच त्यांची जागा दाखवून देईल. कितीही लाडक्या बहिणी, भाऊ आले तरी हे सरकार टिकणार नाही. सर्व डावे पक्ष महाविकास आघाडीचे घटक आहेत. मात्र, आघाडीने डाव्यांना गृहित न धरता सन्मानाने वागवून काम केले पाहिजे. समाजवादी भारतातील समाजवादी महाराष्ट्र हे स्वप्न आता आपल्याला पूर्ण करायचे आहे.

डॉ. उदय नारकर,
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

सध्याच्या परिस्थितीत गेल्या वर्षभरात दुर्दैवाने राज्यात 557 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सरासरी रोज सात शेतकरी आत्महत्या करत असल्याची निंदनीय बाब आपल्या राज्यात घडत आहे. सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. डाव्या विचारांची लढाई ही शेतकर्‍यांची लढाई आहे. भविष्यात बेरोजगारांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्याचबरोबर वीज, कामगार, कष्टकरी, शेतकरी यांच्यावर होणारे अन्यायविरोधात आवाज उठविण्याचे काम कायमच डाव्या विचारांनी केले आहे. डावे पक्ष हे महाविकास आघाडीचेच घटक पक्ष आहे. मात्र, येणारे सरकार महाविकास आघाडीने जागतिक पक्षाच्या हिताचाही विचार करायला हवा.

प्रतापराव होनाडे,
समाजवादी पार्टी

डाव्या विचारांना तसेच सत्यशोधकांना एकत्र आणण्याचे काम आपल्याला करायचे आहे. शेतकर्‍यांची कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव आदी शेतकर्‍यांच्या सार्‍याच प्रश्‍नांसाठी त्यांच्या पाठीशी आपण खंबीर उभे राहात आहोत. शेतकरी कामगार पक्षाने गेल्या 77 वर्षांत अनेक चळवळी उभारल्या. शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांसाठी तसेच शेतीमालाला योग्य दर मिळावा यासाठी ठाम भूमिका घेतली. सध्याचे सरकार हे जातीवाद घडविणारे तसेच सनातनी सरकार आहे. हे सरकार हटविण्याची गरज आहे. भविष्यात महायुतीचे सरकार पाडून महाविकास आघाडीचे सरकार येणे शेतकरी कष्टकर्‍यांसाठी अत्यंतमहत्त्वाचे आहे.

कॉम्रेड किशोर ढमाले



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना संविधानातून मतदानाचा हक्क दिला.निवडणूक हेच संघर्षाचे व्यासपीठ आहे. मतदानाच्या हक्काची तरतूद घटनेत असतानादेखील बिहारमध्ये मतदान करण्याचा अधिकार नव्हता. ते अधिकार सर्वसामान्य घटकांना देण्याचे काम केले. संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना दणका देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जास्तीत जास्त लोकनेते विधानसभेमध्ये गेले पाहिजेत. गोरगरिबांचे राज्य येण्यासाठी शेकापचे खासदार, आमदार संसदेत पाठवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा. आरएसएसप्रणित भाजपचा मनमानी कारभार मोडीत काढण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येणे काळाची गरज आहे. देशामध्ये सध्या गोरगरिबांसाठी भयावह परिस्थिती आहे. गरिबांच्या अधिकार सुरक्षित नाहीत. गोरगरीबांना अधिकार देण्यासाठी संविधानाचे संरक्षण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कॉमे्रड दीपांकर भट्टाचार्य यांनी केले.


महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांनी समाजपरिवर्तन केले आहे. पंढरपूर एक ऐतिहासिक भूमी आहे. या भूमीतून प्रेरणा घेत अनेक लढे निर्माण झालेले आहेत. यातूनच अनेक क्रांतिकारी भूमिका घेण्यात आलेल्या आहेत. या भूमीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनानिमित्त येणे संधी मिळाली त्याचा मला मनापासून आनंद होत आहे. गरिबांना सन्मान मिळावा, त्यांच्या हक्क त्यांना मिळावे यासाठी बिहार राज्यामध्ये वेगवेगळ्या भूमिकेतून काम केले. दलित, शेतकरी, कष्टकरी घटकाला एकत्र करून वेळोवेळी लढे दिले.


देशातील नागरिक अशिक्षित राहावा, देशात गुलामीचे राज्य निर्माण व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हिटलरनुसार कारभार आरएसएस करत आले. भांडवलदारांना अभय देऊन गोरगरिबांचे करण्याचे काम हे सरकार करत आहे. सध्या देशात मूठभर श्रीमंतांच्या हातात देशाचा कारभार आहे. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स लावून गोरगरिबांची मोठ्या प्रमाणात लूट करण्याचे काम केले जात आहे. लोकशाही नष्ट करण्याचा घाट यांनी घातला आहे. त्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे अनेक पक्षांनी एकत्र येऊन याविरोधात लढा देण्याची गरज आहे. शाहू, आंबेडकरांचे विचार घेऊन चालणार्‍या तरुणांना तुरुंगात टाकले जात आहे. त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न ते सरकार करत आहे, अशी टीका कॉम्रेड दिपांकर भट्टाचार्य यांनी केली.

Exit mobile version