। पनवेल । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील पनवेलसह उर्वरित 14 तालुक्यात 98 वर्षे जुनी व सर्वांत मोठ्या पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत परिवर्तन पँनलचे सर्वच्या सर्व 21 उमेदवार विजयी होऊन बाजी मारली आहे. 200 कोटींची उलाढाल असलेल्या पतपेढीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
1924 साली स्थापन करण्यात आलेली पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी जिल्ह्यातील सर्वांत मोठी पतपेढी मानली जाते. जिल्ह्यातील 15 तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सदस्य आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे निवडणूक लांबली होती. पतपेढीची संचालक मंडळाची पंचावार्षिक निवडणूक पार पडली. मागील सात वर्षे कार्यभार सांभाळणारे सत्ताधारी पॅनल आणि त्यांच्या विरोधात परिवर्तन पँनल अशा दोन गटांत निवडणूक पार पडली.
पतपेढीचे एकूण मतदार 3 हजार 119 इतके असून 3 हजार 32 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पतपेढीवर वारंवार एकच सदस्य निवडून देणे, कर्जत शाखेच्या खरेदीत झालेले गैरव्यवहाराचे आरोप, सेवानिवृत्त होणार्या शिक्षकांना उमेदवारी देणे आणि शिक्षकांची असलेली प्रचंड नाराजी यामुळे सत्ताधारी पॅनल सर्वच्या सर्व 21 जागांवर पराभव पत्कारावा लागला. 98 वर्षांत पॅनल पध्दतीने पहिल्यांदाच निवडणूक झाल्यामुळे हा एकतर्फी विजय झाला असल्याचे बोलले जात आहे.
सोपान चांदे, विनोद जोशी, आनंद पाटील, मोहन पाटील, रविंद्र पाटील, विठोबा पाटील, विज्ञान पाटील, कृष्णा पिंगळा, सुभाष बुंधाटे, कैलास भोईर, मोहन भोईर, वसंत मोकल, अरविंद मोरे, संदिप म्हात्रे, हितेंद्र म्हात्रे, महेंद्र शिर्के, जगदिश म्हात्रे, जीवन तेलंगे,संदीप पाटील, उज्वला कनोजे, सुमित्रा खेडेकर अशी विजयी उमेदवारांची नावे आहेत. परिवर्तन पॅनलचे प्रमुख म्हणून राजा म्हात्रे, सोपान चांदे, जगदिश म्हात्रे, देवानंद पिंगळे, रोशन तांडेल, भगवान घरत, प्रमोद पाटील, शंकर पाटील, अमरचंद्र पाटील, विनोद कडव, अ. झी. ठाकूर, जयश्री म्हात्रे यांनी काम पाहिले
आमच्यावर शिक्षकांनी टाकलेला विश्वास आम्ही पुढील पाच वर्षात सार्थ ठरवून शिक्षकांचे हित जोपासण्याचा काम आम्ही प्रामाणिकपणे करत राहू.
– विनोद जोशी (विजयी शिक्षक उमेदवार )