एसटी महामंडळातील बदल्या होणार पारदर्शक

संगणकीय अ‍ॅप पद्धतीचा मोठा फायदा

। मुंबई । प्रतिनिधी ।

एसटी महामंडळामध्ये काम करणार्‍या चालक-वाहकापासून अधिकार्‍यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. यामुळे बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार असून सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचार्‍यांना समान न्यायाची हमी या नव्या पध्दतीने शक्य होणार आहे.

एसटी महामंडळामध्ये चालक-वाहकापासून अधिकार्‍यांपर्यंत सुमारे 87 हजार कर्मचारी सध्या कार्यरत आहे. एक मध्यवर्ती कार्यालय, सहा प्रदेश, त्या प्रदेशांतर्गत 31 विभाग आणि या विभागांतर्गत कार्यरत असलेले 251 आगार..! या बरोबरच तीन मध्यवर्ती कार्यशाळा, 9 टायर पुनस्त:रण प्रकल्प आणि एक मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था असा एसटी महामंडळाचा अवाढव्य पसारा आहे. या सर्व आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी गंभीर आजारपण, पती-पत्नी एकत्रीकरण, आपापसातील बदली अशा अनेक कारणास्तव विनंती बदलीचे अर्ज त्यांच्या कार्यालयीन प्रमुखांकडे सादर करत असतात. परंतु विविध प्रकारच्या हस्तक्षेपामुळे, बदल्यांमध्ये अनियमितता होत असते. परिणामी, कर्मचार्‍यांना योग्य प्रकारे न्याय मिळत नाही. अनेक कर्मचार्‍यांचे विनंती बदली अर्ज वर्षानुवर्ष धुळखात पडलेले असतात. याला आळा घालण्यासाठी आणि सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचार्‍यांना समान न्याय मिळण्याच्या हेतूने महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्या विशेष पुढाकाराने बदल्या संदर्भातील संगणकीय प्रणालीव्दारे अ‍ॅप एसटी महामंडळाकडून विकसीत करण्यात येत आहे.

संबंधित कर्मचार्‍याला विनंती बदलीमध्ये तीन पर्याय देण्याची मुभा देण्यात आलेली आहे. बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी भविष्यात संगणकीय अ‍ॅप पद्धतीचा मोठा फायदा होणार असून विविध जात प्रवर्ग, बिंदु नामावली विचारात घेवून रिक्त पदाच्या ठिकाणी सेवा जेष्ठतेनुसार बदल्या करण्याची संगणकीय पध्दत महामंडळाने स्विकारली आहे. कर्मचार्‍यांना समान न्याय देण्याबरोबरच महामंडळाच्या मनुष्यबळाचा क्षेत्रनिहाय समसमान वापर करण्यासाठीदेखील हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे. लवकरच या संगणकीय अ‍ॅपव्दारे बदलीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ
Exit mobile version