। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग एसटी स्थानकासमोर झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. या घटनेनंतर एसटी प्रशासन खडबडून जागे झाले असून, कारवाईच्या भूमिकेत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चालकाविरोधात निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
योगेश अडसूळ असे या चालकाचे नाव आहे. हा चालक गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी महामंडळामध्ये कार्यरत आहे. अलिबाग एसटी बस आगारात चालक म्हणून तो काम करतो. गुरुवारी (दि.27) सकाळी पनवेलहून अलिबागला निघाला साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अलिबागमध्ये आल्यावर पुढे असलेल्या दुचाकीला धडक लागली. या धडकेत चालक जागीच ठार झाला. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, निष्काळजीपणाने वाहन चालवून अपघात केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर एसटी महामंडळाचे प्रशासनदेखील कामाला लागले आहे. एसटी बसचालकाविरोधात निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती विभाग कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे चालक लवकरच निलंबित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.