महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महापालिकेच्या दोन प्रभागांत काम करणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. ‘क’ प्रभागाचे अरविंद पाटील आणि ‘ब’ प्रभागाचे सदाशिव कवठे यांची बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारलेल्या या प्रभाग अधिकाऱ्यांना बदलीमागील कारण मात्र समजू शकलेले नाही.

‘क’ प्रभागात मागील काही महिन्यांपासून प्रभाग अधिकारी म्हणून काम पाहणारे अरविंद पाटील यांची बदली ‘ब’ प्रभागामध्ये, तर ‘ब’ प्रभागात काम करणारे प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांची बदल ‘क’ प्रभाग म्हणजेच कामोठ्यात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने आस्थापना विभागाने हा निर्णय घेतला. आयुक्तांनी घेतलेला निर्णयामुळे बदलीची चर्चा रंगली आहे.

या दोन्ही अधिकाऱ्यांबाबत कोणतीही तक्रार नसतानाही, ही बदली करण्यात आली आहे. बदलीमागे कोणतेही कारण नसून, या प्रशासकीय बदल्या असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर काही अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, कवठे यांनी ‘क’ प्रभागाची सूत्रे हाती घेताच, बेकायदा बांधकामाविरोधात कारवाईला सुरुवात केली. प्रभाग समिती ‘क’ मधील कामोठे सेक्टर-19 मधील एका सोसायटीतील अनधिकृत बांधकाम, सेक्टर 20मधील एका सोसायटीमधील गाळ्यासमोरील अनधिकृत बांधकाम तोडून जागा पूर्ववत करण्यात आली. याशिवाय शहरातील 10 हातगाड्या जप्त करून तोडण्यात आल्या.

Exit mobile version