। पेण । प्रतिनिधी ।
सुमारे वीस ते पंचवीस वर्षानंतर रायगड जिल्ह्यातील पेण, रामवाडी व वडखळ येथील एसटी स्थानकांनी कात टाकल्याने स्थानकांच्या कायापालटाला सुरूवात झाली असून, प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
रायगड जिल्हयातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेण, रामवाडी व वडखळ बस स्थानकाची दुरवस्था झाली होती. मागील सुमारे 20 ते 25 वर्षापासून येथील प्रवाशांना खड्डयातून, चिखलातून, पाण्यातून, धूळीतून व मोठमोठ्या दगड रेतीमधून प्रवास करायला लागायचा. स्थानकातील खड्ड्यामधील दगड एसटीच्या टायरखाली येऊन उडत असल्याने काही प्रवाशांना दुखापतही व्हायची. पावसाळयात तर बसस्थानकात गुडघाभर पाणी साचायचे, संपूर्ण बसस्थानक चिखल व पाण्याने भरायचा. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, विद्यार्थीवर्गासह प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांना एसटीने प्रवास करणे जिकरीचे झाले होते. याबाबत प्रवासी संघटना व जनतेने तक्रारी करून देखील त्याकडे एसटी प्रशासन दुर्लक्ष करीत होते.
पेण व वडखळ बसस्थानकांना चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्म बनवून त्यावरून लाल परी धावायला सुध्दा लागली आहे. तर रामवाडी एसटी स्थानकात प्लॅटफॉर्म बनवण्यात येत आहेत. उंच भराव करून काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने भविष्यातही या स्थानकांमध्ये पावसाळयात पाणी साचून प्रवाशांना त्रास होणार नाही. पेण व वडखळ येथील स्थानकांचे काम जलद गतीने सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर एसटी स्थानकात पे अॅड पार्कची व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्यायोगे प्रवाशांना त्यांची दुचाकी वाहने एसटी स्टँड परिसरात पे अॅड पार्कमध्ये लावता येतील. त्यातून एसटी महामंडळाला उत्पन्न सुरू होईल अशी माहिती पेण स्थानकाच्या आगार व्यवस्थापक अपर्णा वर्तक यांनी दिली.
पेण, वडखळ या बसस्थानकातून लालपरी आता खर्या अर्थाने धावायला सुरूवात झाली आहे. याचे सर्व श्रेय रामेश्वर कंन्स्ट्रक्शनचे मालक व त्यांच्या टिमला द्यावे लागेल. ऐन गणपती उत्सवाच्या काळात रामेश्वर कन्स्ट्रक्शनने केलेले काम अतिशय नेटनेटके व जलदगतीने केले आहे. या बाबत रामेश्वर कंन्ट्रक्शनचे मालक राजू पिचिका यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, एसटी स्थानकांची सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पेण बसस्थानकांसोबतच रामवाडी आणि वडखळ बसस्थानकात सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. तर लवकरच नागोठणे एसटी स्थानकाचे कामही सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.