पोलीस उपअधीक्षक रविंद्र दौंडकर यांचे आवाहन
। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे शहर व विभागात सर्व धर्मीय समाज बांधव, सर्व नागरिक एकोप्याने राहतात. सर्व सण उत्सव एकत्र येऊन गुण्यागोविंदाने साजरे करतात असा इतिहास आहे. याच पार्श्वभूमीवर ईद-ए-मिलाद व अनंत चतुर्दशी दिवशी काढण्यात येणार्या गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी जातीय सलोखा कायम राखत गैरसमजातून वाद निर्माण होत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक रविंद्र दौंडकर यांनी नागोठणे पोलीस ठाण्यातील शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित नागोठणेकर नागरिकांना केले.
ईद-ए-मिलाद, अनंत चतुर्दशी दिवशी गणपती विसर्जन तसेच पुढे येणारी विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर नागोठणे पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या उपस्थितीत शांतता समिती, मोहल्ला कमिटी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. यावेळी सहा.पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच अखलाक पानसरे, नाजीम नाळखंडे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, प्रकाश कांबळे, अशपाक पानसरे, सिराज पानसरे, आसिफ अधिकारी, संजय काकडे, राजेश्री टके, निलोफर पानसरे, बिलाल कुरेशी, राजेंद्र गुरव, किर्तीकुमार कळस, सुनील कुथे, संतोष जैन, मुजफ्फर कडवेकर, हनीफ पठाण, नितीन राऊत, रविंद्र कदम, पो.ह. विनोद पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.