गणेशोत्सवात अडीच लाख प्रवाश्यांचे दळणवळण

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
वैश्‍विक महामारीच्या काळात श्रमिक स्पेशलच्या माध्यमातून महत्वाची कामगिरी पार पाडणार्‍या कोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात लाखो भाविकांचे दळणवळण सुखरूप केले आहे. साधारणतः लाख 40 हजाराहून अधिक भाविकांनी कोकण रेल्वेने प्रवास केला आहे. वैश्‍विक महामारीचे संकट असतानाच गणेशोत्सवासाठी कोकणातर्‍या आणि परतणार्‍या भाविकांची संख्या लाखात असते. अशा वेळी त्यांच्या प्रवासाच्या नियोजनाबद्दल अनेक प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाली असताना कोकण रेल्वेने नियोजन करत मुंबईतून कोकणातील गावागावात आणि उत्सवाच्या सांगतेनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखरूप बनवला यामधून कोकण रेल्वेने 7 कोटी 72 लाख रुपयांचा व्यवसाय साधला आहे. आपल्या नियमित गाड्यांचे वेळापत्रक बिघडू न देता सलग20 दिवसातील 250 हून अधिक जादा गाड्यांच्या फेर्‍यांचे हे नियोजन कोकण रेल्वेच्या कर्मचारी अधिकार्‍यांनी 24-24 तास सलग काम करत यशस्वी केले आहे. गणेशोत्वासाठी कोकण रेल्वेने टप्याटप्याने नियोजन करत कोकणात जाणार्‍या भाविकांसाठी स्पेशल गाड्यांची घोषणा केली होती. पहिल्या टप्यात जाहीर झालेल्या गाड्या तात्काळ आरक्षित होताच चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी अधिकच्या स्पेशल गाड्यांची घोषणा करण्यात आली. उत्सवाच्या दोन दिवस आधीपासून उत्सवाच्या सांगतेपर्यंत कोकण रेल्वेने मार्गावर तब्बल 256 गाड्यांचे नियोजन केले. नियमित मार्गावर धावणार्‍या गाड्यांचे वेळापत्रक सांभाळत अधिकच्या 256 फेर्‍यांचे यशस्वी आयोजन सहजसुलभ नव्हते पण हे आवाहन कोकण रेल्वेच्या कामगार अभियंता आणि अधिकार्‍यांनी आपल्या घरात उत्सव असतानाही अहोरात्र मेहनत करत यशस्वी केले. महत्त्वाचे म्हणजे, यामध्ये कोठेही गोंधळाची स्थिती निर्माण झाली नाही. अगर आरोग्यनिर्बंधाची पायमल्ली झाली नाही. कोकण रेल्वेने गणेशोत्सवापूर्वीच युद्ध पातळीवर काम करत वीर ते रोहा या मार्गावरील दुपदरीकरणाचे काम पूर्ण करून घेतले. याचा फायदा गणेशोत्वाच्या काळात झाल्या. कोकण रेल्वेने वेळोवेळी केलेली वेळापत्रके लोकांपर्यंत पोहोचण्यात माध्यमांनी मोठं सहकार्य केले.जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी महिनाभरा आधीपासून नियोजन केल्याने आरोग्य तपासणी आणि वाहतूक नियमनाची कामे सोपी झाली. या करीता कोकण रेल्वेने सहकार्य करणार्‍या या सर्व यंत्रणांचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे स्वतःच्या यशस्वीतेसंदर्भात समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version