| शहापूर | वृत्तसंस्था |
पावसाळी पर्यटनासाठी मुसई धरणावर गेलेला तरुण वाहून गेल्याची घटना कल्याणच्या शहापूर तालुक्यात घडली आहे. खैरा रोड इथे मुसई धरणाच्या बॅकवॉटर बंधाऱ्यात तरुणाचा पाय घसरून तो पडला होता. रविवारी (दि.25 ) सायंकाळी तो पाय घसरून पडला आणि बंधाऱ्यात वाहून गेला. अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. तरुण कल्याणमध्ये जिम ट्रेनर होता आणि तो उत्तम जलतरणपटू होता अशी माहिती समोर येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीसस्थानका अंतर्गत येणाऱ्या डोळखांब भागात कल्याणचा 12 मुलांचा ग्रुप आला होता. खैरा रोड येथील केरला सिटी येथे वर्षा सहलीसाठी या मुलांच्या ग्रुपमधील एक तरुण मुसई धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बनविण्यात आलेल्या केटी बंधाऱ्यात वाहून गेला. विनायक वाजे असे धरणाच्या बॅक वॉटरमधील बंधाऱ्यात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तो कल्याणमध्ये जिम ट्रेनर म्हणून काम करतो. तसेच तो उत्तम पोहत असल्याची माहितीही त्याच्या सोबतच्या तरुणांनी दिली. विनायक वाजे मुसई धरणाच्या बॅक वॉटर मध्ये बनवण्यात आलेल्या केटी बंधाऱ्यात आंघोळीसाठी आपल्या ग्रुपसह उतरला होता. दुर्दैवाने त्या बंधार्यावरून त्याचा पाय घसरल्याने पाण्यात पडून वाहून गेला. काल सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. अंधार असल्याने शोध कार्य करण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती. त्यानंतर जीवन रक्षक टीम दाखल झाली पण अंधार असल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. आज पुन्हा पहाटे सहा वाजल्यापासून किन्हवली पोलिसांच्या विनंतीवरून जीवन रक्षक टीमकडून शोधकार्य सुरू केले गेले. सकाळपासून 7 सदस्य विनायक वाजे याचा शोध घेत आहेत. अद्याप तो सापडलेला नाही. जीवन रक्षक टीममध्ये समीर चौधरी, रविंद्र मडके, गजानन शिंगोळे, रमेश डिंगोरे , भावेश ठाकरे, अनिल हजारे व अविनाश सासे असे 7 जण शोध घेत आहेत.