ट्रॉमा केअर सेंटर कागदावर

नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे दिवसेंदिवस ‌‘अपडेट’ होत असून, महामार्गावरील अपघातग्रस्त रूग्ण उपचार करण्यापासून ते विविध आजारांवरील रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी सज्ज आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयाशेजारी ट्रॉमा केअर सेंटर मंजूर झाले होते. मात्र, गेले अनेक दिवस त्याच्या उभारणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. मुंबई-गोवा व दिघी-पुणे अशा महत्त्वाच्या राज्य मार्गावर अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार करण्यासाठी या सेंटरची नितांत गरज आहे. मात्र, त्याच्या उभारणीसाठी शासनाला मुहूर्त सापडत नसल्याने ते फक्त कागदावर उरले आहे. त्यामुळे रुग्ण व नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

माणगाव तालुक्यासह अन्य तालुक्यातून नागरिक उपचारासाठी मोठ्या संख्येने येतात. सामान्य नागरिकांना खासगी-महागडी रुग्णसेवा परवडत नसल्याने दक्षिण रायगडसह नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अनेक रुग्ण माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. नवनवीन उपचारासाठी लागणाऱ्या यंत्रसामुगी, पुरेसा ऑक्सिजन साठा, डायलेसिस विभाग, यामुळे हे रुग्णालय कात टाकत आहे. माणगाव ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी मिळाल्यामुळे रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाच्या वाटचालीत आणखी एक भर पडणार असून, माणगावची आरोग्य यंत्रणा ट्रॉमा केअर सेंटरमुळे अधिक बळकट होणार आहे. मात्र, हे सेंटर गेले अनेक दिवस कागदवरच राहिले आहे. त्याच्या उभारणीसाठी शासन एक पाऊल पुढे कधी टाकणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. या सेंटरमध्ये रस्त्यावरील अपघातग्रस्त रुग्णांवर तातडीने उपचार होऊन त्यांचे प्राण वाचणार आहेत. या सेंटरला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली असून, ते आजही कागदावरच राहिले आहे. या ट्रॉमा केअर सेंटर उभारणीला मुहूर्त कधी सापडणार, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

माणगाव पंचायत समितीची स्वतंत्र इमारत गेली 16 वर्षांपूर्वी माणगाव प्रशासकीय भवन लगत भव्य स्वरुपात शासनाने बांधली आहे. त्याठिकाणी जि.प.च्या विविध विभागांचे काम सुरू आहे. मात्र, राजिपच्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांची कार्यालय आजही या जुन्या इमारतीत सुरू आहेत. या इमारतीलगत माणगाव उपजिल्हा रुग्णालय असल्याने या ठिकाणी शासनाने ट्रॉमा केअर सेंटर दोन वर्षांपूर्वी मंजूर केले असून, ही जागा उपजिल्हा रुग्णालयाकडे वर्ग केली आहे. त्या जागेवर ट्रॉमा केअर सेंटर उभारले जाणार आहे. या सेंटरच्या इमारतीचा आराखडा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आल्याचे समजते. मात्र, हे काम कधी सुरू होणार, हा संशोधनाचा भाग आहे. याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

तटकरेंचे अपयश
ट्रॉमा केअर सेंटरला दोन वर्षांपूर्वीच मंजुरी मिळाली आहे. परंतु, शासनाच्या दुर्लक्षामुळे अद्याप ते कागदावरच राहिले आहे. विकासाच्या बाता मारणाऱ्या खा. सुनील तटकरे यांनाही या गंभीर प्रश्नाकडे आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही. सत्तेत असूनही काहीच करता न आल्याने खा. तटकरेंचे हे अपयश आहे, अशी चर्चा सध्या माणगावातून केली जात आहे.
Exit mobile version