मुंबई-रत्नागिरीचा प्रवास साडेतीन तासांत

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
कोकणातील पर्यटन आणि अर्थकारणाला चालना देण्याच्या दृष्टीने मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणे नवीन मुंबई-गोवा ग्रीनफिल्ड महामार्गाला गती मिळाली आहे. या मार्गाच्या डीपीआरचे (डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट) काम सुरू झाले. यामुळे मुंबई-रत्नागिरी अंतर अवघ्या साडेतीन तासांत कापले जाणार आहे. रस्ते चांगले झाले, की त्या भागात समृद्धी येते. त्याप्रमाणे ग्रीनफिल्ड मार्ग कोकणासाठी समृद्ध ठरणार आहे, असे मत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, की मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षे सुरू आहे. केंद्र शासनाचा हा मार्ग आहे. मात्र, राज्य शासनाच्या नावे खापर फोडले जात आहे. आम्ही यामध्ये बदनाम होत आहोत. परंतु जेव्हा गणेशेत्सव येतो, तेव्हा टोळ माफिच्यादृष्टीने आमच्याकडे बोट दाखविले जाते. मात्र, गणेशभक्तांसाठी आम्ही तो निर्णय घेऊन टोल माफ करतो. या राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे आता आणखी दोन मार्ग होणार आहेत. त्यात कोस्टल हायवेचा समावेश आहे. त्याचे रुंदीकरण करून समुद्र किनार्‍यावरून हा मार्ग येणार असल्याने तो अनेक खाड्या, जेटींनी तो जोडला जाणार आहे. पर्यटकांसाठी ही एक पर्वणी असणार आहे. एवढे नव्हे, तर दुसरा ग्रीनफिल्ड मार्ग देखील होणार आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी या मार्गाची निर्मिती केली जात आहे. त्याला आतापर्यंत गती मिळाली नव्हती. मात्र आता मिळाली. या मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच त्याची पुढची प्रक्रिया सुरू होईल.

Exit mobile version