पोलीस, पालिका प्रशासनाचे ढिसाळ नियोजनाचा फटका
| महाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दशकानंतरदेखील अपूर्णच असल्याने इंदापूर ते माणगाव यादरम्यान गेली अनेक वर्षे सुरू असलेली वाहतूक कोंडी आजदेखील कायम आहे. सध्या शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये पर्यटकांचा ओघ कोकणाकडे सुरू आहे. यामुळे या दोन दिवशी इंदापूरपासून माणगावपर्यंत वाहन चालकांना आणि पर्यटकांना तासन्तास उभे राहावे लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाढते अपघात आणि गणेशोत्सवामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम हातामध्ये घेण्यात आले. मात्र, ढिसाळ नियोजन आणि इतर तांत्रिक अडीअडचणीमुळे दहा वर्षे उलटून गेली तरी मुंबई-गोवा महामार्ग अद्याप परिपूर्ण झालेला नाही. याचा फटका मात्र वाहन चालक आणि वाहनांमधील प्रवाशांना बसत आहे. इंदापूर ते माणगाव टेमपाले गावापर्यंत रस्त्याचे काम सुरू असल्याने आणि माणगाव शहराच्या बाहेरून नेला जाणारा महामार्ग तांत्रिक अडचणीमुळे धूळ खात पडल्याने माणगावमध्ये प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि नगर प्रशासनाकडून ठोस कारवाई तसेच नियोजन केले जात नसल्याने दर शनिवार, रविवार वाहतूक कोंडी होत आहे. माणगावमधून निजामपूर-पुणे जाणारा मार्ग तसेच श्रीवर्धनकडे जाणार्या दोन मार्गांचे प्रवेश असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. गेले अनेक वर्षे होत असलेल्या या वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय शोधला जात नाही. इंदापूर आणि माणगाव यादरम्यान दुभाजक नसल्याने वाहन चालकदेखील बेशिस्तपणे वाहने दामटवत असतात. एक रांग न ठेवता तीन रांगा तयार होत असल्याने वाहने पुढे सरकावणे सहज शक्य होत नाही.
प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याबाबत योग्य भूमिका घेतल्यास आणि पर्यायी व्यवस्था सुचवल्यास वाहतूक कोंडी होणार नाही, असे वाहन चालकांचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी माणगावमधील अतिक्रमण हटवल्याच्या बतावण्या करण्यात आल्या. रस्त्याच्याकडेला असलेली दुकाने मागे सरकवली गेली असली तरी कारवाई थांबल्यानंतर माणगावमध्ये जैसे ते स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे कामदेखील रखडलेले असल्याने जागोजागी ठेवण्यात आलेल्या पर्यायी रस्ते अपघातास आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. यामुळे शनिवारी आणि रविवारी सकाळपासूनच आठ ते दहा किमी अंतरावर वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहेत. गेली दहा वर्षे करोडो रुपये खर्च करून मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास येत असले तरी वाहतूक कोंडीची समस्या मात्र कायम राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काय अपेक्षित आहे
1) ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्या सारखी परिस्थिती आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या दुभाजकांची आवश्यकता आहे. 2) ज्या ठिकाणी महामार्गाचे काम अपूर्ण आहे अशा ठिकाणी पर्यायी मार्ग काढणे आवश्यक आहे. 3) ज्या वाहन चालकांकडून रांगेचे उल्लंघन होत आहे अशा वाहन चालकांवर कारवाई झाली पाहिजे. 4) इंदापूर आणि माणगाव मध्ये रस्त्याकडेला बाजारपेठ असल्याने तासनतास उभी राहणारी वाहने, मालवाहू वाहने, तत्काळ हटवली पाहिजेत. 5) शनिवार रविवार या दोन दिवशी माणगाव इंदापूर यादरम्यान वाहतूक पोलिसांची वाढ केली पाहिजे