मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ वाचणार

अटल सेतू-एक्स्प्रेसदरम्यानचे 67 टक्के काम पूर्ण

| पनवेल | प्रतिनिधी |

एमएमआरडीएकडून अटल सेतू ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेदरम्यान 7.35 किलोमीटर लांबीचा सहापदरी उन्नत जोडमार्ग उभारला जात आहे. त्याचे 67 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर दक्षिण मुंबई ते पुणे प्रवासाच्या वेळेत सुमारे 60 ते 90 मिनिटांची बचत होणे अपेक्षित आहे. तसेच मुंबई, नवी मुंबई आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गादरम्यानची वाहतूक वेगवान होणार आहे.

टल सेतूमुळे निर्माण झालेल्या दळणवळण सुविधांचा विस्तार करणारा अटल सेतू ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाशी जोडून वाहतुकीतील प्रमुख अडथळे दूर करणे, वाहनांची वाहतूक अधिक सुरळीत करणे हा एमएमआरडीएचा उद्देश आहे. पनवेल मुख्य जंक्शन परिसरात, गरजेपेक्षा अतिरिक्त वाहतुक कोंडी निर्माण होत आहे. या ठिकाणी अटल सेतूवरून येणारी वाहतूक प्रमुख महामार्गावरील वाहतुकीशी एकत्रित होते. ही समस्या दूर करण्यासाठी एमएमआरडीए ताण चिर्ले आणि पळस्पे विभागांतून स्वतंत्र सहापदरी उन्नत मार्ग विकसित करत आहे.
चिर्ले आणि पळस्पे या दोन्ही विभागांतील एकूण बांधकामाचा विचार करता 67 टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या बांधकाम वेगाने सुरू असून, पाया, स्तंभ, गर्डर आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. यामध्ये 113 पाइल्स आणि 42 ओपन फाउंडेशन्सचा समावेश आहे.

Exit mobile version