तीन वेळा पुराचा तडाखा; संरक्षण कठडे वाहून गेले
| रोहा | प्रतिनिधी |
रोहा शहरातील कुंडलिका नदीवरील पुलावर संरक्षण कठडे तुटून वाहून गेल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पुलावरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने संरक्षण कठडे उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीला मोठा पूर आला होता. त्यानंतर सलग चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे या कालावधीत तब्बल तीन वेळा कुंडलिका नदीला मोठा पूर आला. पुराच्या प्रत्येक लोंढ्यात नदीचा प्रवाह अत्यंत वेगवान होता. त्यामुळे पुलाला सार्वजनिक बांधकाम उपविभागाने बसविलेले लोखंडी संरक्षण कठडे पूर्णपणे पाण्याखाली गेले. अखेर प्रचंड वेगाच्या पाण्याच्या प्रवाहापुढे हे कठडे टिकू शकले नाहीत. पाण्याच्या प्रवाहासोबत अनेक ठिकाणी हे कठडे तुटून वाहून गेले असून, या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसहित वाहनचालक तसेच प्रवासी नागरिक यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
सध्या पुलाच्या कडेला संरक्षण कठडे नसल्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी, मुसळधार पावसात किंवा कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. एखाद्या वाहनाचे नियंत्रण सुटल्यास अथवा घसरल्यास थेट नदीपात्रात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुराच्या पाण्यात संरक्षण कठडे वाहून गेल्याने पुलावर प्रवास करणे अथवा पायपीट करणे जिकिरीचे जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने संरक्षण कठडे उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मजबूत, टिकाऊ संरक्षण कठडे बसवावेत
रोहा शहर आणि परिसराला जोडणारा हा पूल अत्यंत महत्त्वाचा असल्याने दररोज हजारो वाहनांची ये-जा येथे सुरू असते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कुंडलिका नदी पुलावर मजबूत व टिकाऊ संरक्षण कठडे बसवून नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
