| महाड | प्रतिनिधी |
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून जाणाऱ्या महाड-मंडणगड तालुक्यातील तुडील फाटा ते आदिस्ते फाटा या आंबेगणी घाटातील प्रवास सध्या प्रवाशांसाठी अत्यंत त्रासदायक व जीवघेणा ठरत आहे. घाटातील कमालीचा अरुंद रस्ता, टप्प्या-टप्प्यावरील तीव्र वळणे आणि संरक्षण भिंतच नसल्यामुळे येथे रोजच अपघातांची मालिका सुरू आहे. विशेषतः या धोकादायक वळणांवरून एसटी बस नेताना चालकांची मोठी दम छाक होऊन चालकाला तारेवरची कसरत करावी लागते. प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने, अखेर कुडूक खुर्द (हनुमानवाडी) येथील ग्रामस्थांनी मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर या रस्त्याचे रुंदीकरण करावे आणि मजबूत संरक्षण भिंत उभारावी, असे साकडे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मंत्री महोदयांना घातले आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता शासन यावर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. अनेक दुर्घटना होऊनदेखील या विषयाकडे प्रशासन गांभीर्याने पाहात नाही, याबाबत खंत व्यक्त करण्यात येत आहे.






