। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे उड्डाणपुलावर जखमी अवस्थेत बसलेल्या गायीवर तातडीने पशुवैद्यकीय अधिकार्याने उपचार केल्याने ती लवकरच पूर्ण बरी होणार असल्याचे समाधान पोलिसांना मिळाले आहे.
येथील उड्डाणपुलावर एक गाय जखमी अवस्थेत बसली असल्याचा कॉल पनवेल शहर पोलिसांना आला. तातडीने त्याठिकाणी पोलीस हवालदार अमोल डोईफोडे, पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद फुलकर, पोलीस शिपाई प्रवीणकुमार सोनावणे त्याठिकाणी पोहचले. यावेळी हॉटेल व्यावसायिक गणेश शेट्टी सुद्धा उपस्थित होते. जखमी अवस्थेतील गायीला त्यांनी त्वरित पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सदर गायीवर प्राथमिक उपचार केले. गायीच्या कानावर लावलेल्या बिल्ल्यावरून सदर गायीच्या मालकाचा पत्ता मिळाला. त्याच्याशी पोलिसांनी त्वरित संपर्क साधून त्याला यासंदर्भात माहिती दिली व ती गाय त्याच्या सुपूर्द करण्यात आली. पोलिसांच्या तत्परते मुळे जखमी गायीवर त्वरित उपचार झाल्याने नागरिकांनी पनवेल शहर पोलिसांचे कौतुक केले आहे.