अंबा नदीवरील आजारी पुलावर उपचार

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तरुणांचे अनोखे आंदोलन

| सुधागड-पाली | वार्ताहर |

वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मात्र, या मार्गावरील पाली अंबा नदीवरील नव्या पुलाचे काम चार वर्षांपासून सुरू आहे. ते आजतागायत झालेले नाही. शिवाय, जुन्या पुलाची दुरवस्था झाली आहे. याकडे एमएसआरडीसी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालीतील तरुणांनी शुक्रवारी (दि.14) अनोखे आंदोलन केले. यावेळी प्रतिकात्मकरित्या या दोन्ही पुलांची आजारी असल्याप्रमाणे डॉक्टरने तपासणी केली आणि औषध, गोळ्या दिल्या, सलाईन लावली व मलमपट्टीदेखील केली.

पालीतील तरुण अमित निंबाळकर, प्रवीण पालकर, तुषार ठोंबरे व अभिजीत ठोंबरे या तरुणांनी हे अनोखे आंदोलन केले. किमान आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे व नवीन पुलाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली. जुन्या पुलावरून क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक होते. शिवाय लोखंडी संरक्षक रेलिंगदेखील तुटल्या आहेत. यामुळे प्रवासाच्या दृष्टीने हा जुना पूल धोकादायक झाला आहे. त्याचीही दुरुस्ती केली जात नसल्याने प्रवासी व नागरिकांमध्ये असंतोष आहे.

Exit mobile version