| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये सोमवार, दि.14 रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दस्तुरी वरून गावात येणाऱ्या ई-रिक्षावर काळोखी या ठिकाणी झाड कोसळल्याने रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, चालकासह तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
सकाळी साडेसहा वाजता दस्तुरी येथून चालक प्रशांत गायकवाड हे तीन प्रवाशांना घेऊन निघाले होते, काळोखी याठिकाणी रिक्षा आली असता अचानक एक झाड त्यांच्या रिक्षावर पडले. यामध्ये गायकवाड यांसह तिघे प्रवाशी गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने येथील नगरपालिकेच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरीसुद्धा ई-रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाळ्यात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे ई-रिक्षा चार्जिंग स्टेशन येथे रिक्षावर झाड पडल्याने दोन ई-रिक्षांचे नुकसान झाले होते. या दोन्ही घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु, गाड्यांचे नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीचा भाग म्हणून या रिक्षा चालकांना आणि जखमी प्रवाशांना शासनाने तातडीची मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.







