मुरुड-रोहा मार्गावर वडाचे झाड कोसळले

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही; काहीकाळ वाहतूक ठप्प

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड-रोहा, इंदापूर मार्गावर खार आंबोली येथे शेकडो वर्षे जुने असलेले वडाचे झाड आज पहाटे सहाच्या सुमारास कोसळल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने रोह्याकडे जाणारा केलघर मार्गाने वळविण्यात आली होती. तर इंदापूर, माणगाव, म्हसळाकडे जाणार्‍या वाहतुकीला राजपुरी मार्गे वळविण्यात आले होती.

सदर घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरुड नगरपरिषद प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन जेसीपी व दोन कटर मशिनच्या सहाय्याने हे भले मोठे वडाचे झाड हटविण्याचे काम सुरू केले. सुमारे पाच तासांच्या प्रयत्नांनंतर हे शेकडो वर्षे जुने वडाचे झाड हटविण्यात आले. दुपारी 12:30 वाजता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

Exit mobile version