वृक्ष लागवड, संवर्धन मोहीम

। तळा । वार्ताहर ।

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने तळा नगरपंचायतीतर्फे नगरपंचायत कार्यालयाच्या मोकळ्या जागेत, अंबेळी डंपिंग ग्राऊंड जागेत वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेचा शुभारंभ मुख्याधिकारी विराज लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करून करण्यात आला. माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत जागतिक पर्यावरण दिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. सर्वत्र होणारी वृक्षतोड त्या बदल्यात न होणारी लागवड याचा परिणाम वातावरणावर होत असून दरवर्षी उष्णतेत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याच्या सूचना शासन स्तरावरून केल्या जात आहेत. दरवर्षी नगरपंचायतीच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून झाडे लावली जातात.

यावर्षी अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प मुख्याधिकारी विराज लबडे यांनी केला असून तशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या आहेत. यानुसार जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने नगरपंचायतीच्या मोकळ्या जागेत अंबेळी डंपिंग ग्राऊंड जागेत वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेचा शुभारंभ करून माझी वसुंधरा शपथ घेण्यात आली. यावेळी नगरपंचायत अधिकारी मांगडे व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version