| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील डोंगराळ परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी रायगड हॉस्पिटल आणि तासगावकर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आला. संपूर्ण डोंगर परिसराचे 100 टक्के वनीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर मातीची धूप होत असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याची शक्यता निर्माण होत होती. ही धूप रोखण्यासाठी आणि परिसर हिरवागार करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.वृक्ष लागवडीत ताम्हण, शिसव, चिंच, कुडा, करंज, बेहडा, पेरू, बांबू, बीटी, आवळा तसेच कोंकोरेस यांसारख्या विविध प्रजातींच्या झाडांचा समावेश करण्यात आला. या विविधतेमुळे परिसरात जैवविविधता वाढीस लागणार असून, दीर्घकालीन पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होणार आहे. डोंगराच्या उतारावर नियोजनबद्ध पद्धतीने झाडे लावल्याने मातीची धूप कमी होणार असून पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल. त्यामुळे भूजल पातळी सुधारण्यासही हातभार लागणार आहे. याशिवाय, या झाडांमुळे पक्षी व वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण होणार असून परिसरात नैसर्गिक समृद्धी वाढणार आहे.या उपक्रमात लावलेल्या झाडांचे संगोपन करण्यासाठी स्थानिक स्तरावर नियोजन करण्यात आले असून, नियमित पाणीपुरवठा व संरक्षणाची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे.







