दाखणे येथे 2100 झाडांची लागवड
। माणगाव । प्रतिनिधी ।
दाखणे हद्दीमध्ये मौजे दाखणे खर्डी बुद्रुक व कोशिंबळे तर्फे निजामपूर या गावांमध्ये विश्वास उभारे प्रतिष्ठानमार्फत रविवारी (दि.16) 2100 झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी दाखणे खर्डी व कोशिंबळे गावातील स्थानिक ग्रामस्थ, महिला मंडळ, तरुण वर्ग तसेच खास मुंबईकर चाकरमानी या स्तुत्य उपक्रमासाठी उपस्थित होते.
दाखणे ग्रामपंचायतीमध्ये विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली असून, नव्याने झालेले डांबरी रस्ते त्याचप्रमाणे गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. समस्त मानव जातीला उन्हाची झळ बसत असून दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत जात आहे आणि आणि असाच उन्हाचा पारा चढत राहिला तर भविष्यात खूप मोठ संकट समस्त मानव जातीवर वाढवणार आहे. त्यासाठी प्रत्येक गोष्ट सरकारकडून प्रशासनाकडून होईल या आशेवर न थांबता प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य म्हणून पर्यावरणाचे संरक्षण करणे कम प्राप्त ठरते. याच भावनेतून विश्वास उभारे प्रतिष्ठानच्या सभासदांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा पहिलाच सामाजिक उपक्रम आहे. यामध्ये आबालवृद्ध सहभागी झाले होते. मागील वर्षी वटपौर्णिमेच्या सणानिमित्त खर्डी बुद्रुक या गावातील समस्त महिलांना 80 वड या वृक्षाचा वाटप करून उपक्रम राबवला होता. त्याचप्रमाणे खर्डी बुद्रुक गावातून लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाताना दोन झाड लावली जातात. तर ज्या वेळेला एखादी मुलगी गावात नव्याने सून म्हणून येते त्यावेळी दोन झाडे लावली जातात. व त्याची जोपासना मनापासून केली जाते.







