आगळ्या वेगळ्या राखीने होणार वृक्षारोपणाची प्रक्रिया

। कर्जत । वार्ताहर ।
रक्षाबंधनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन करण्याची जिज्ञासा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने इनर व्हील क्लब ऑफ अंबरनाथच्या सहकार्याने तालुक्यातील हेदवली शाळेमध्ये करण्यात आला होता. यावेळी वाटप करण्यात आलेल्या राख्या वृक्षारोपणाची प्रक्रिया करणार्‍या आहेत, हे विशेष.

हेदवली प्राथमिक शाळेमध्ये शालोपयोगी साहित्य वाटप व राखी वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. इनर व्हील क्लब ऑफ अंबरनाथ हिलच्या अध्यक्ष स्मिता चौधरी यांच्या हस्ते समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ठाणे जिल्हा अध्यक्ष सुचिता सकपाळ, सचिव हर्षदा कडू, अ‍ॅड. दीपावली सपकाळ, रेणुका सोनवणे, रेखा पुजारी, मेधा मांडेकर, तानाजी भोर्डे आदी उपस्थित होते.

यावेळी रक्षाबंधनाचे औचित्य साधून राख्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी राखीचे महत्त्व सांगताना, ‘या बांबूच्या राख्या आहेत, प्रत्येक राखीमध्ये एका झाडाची बी आहे, अशा सात झाडांच्या बिया सात प्रकारच्या राख्या आहेत, या राख्या कुठेही टाकल्या तरी त्यामधून झाड उगवणारच आहे. सर्व बिया ह्या औषधी वनस्पतींच्या आहेत. हा एका आदिवासी महिलेचा बांबू प्रकल्प आहे. सामाजिक बांधिलकी जपून तिला रोजगार मिळवून आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा र्‍हास करण्यापासून दूर ठेवून त्यांना पर्यावरणसंवर्धन करण्यासाठी तयार करू शकतो’ असा विश्‍वास उपस्थितांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

Exit mobile version