School Tree Plantation: शाळांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट

शाळेला लावावी लागणार 50 झाडे

| रायगड | प्रतिनिधी |

नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताच राज्यासह देशभरातील शाळांना वृक्षारोपणाचे काम करावे लागणार आहे. एक पेड माँ के नाम या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राला 5 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत 53 लाखांहून अधिक झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले असून, त्यानुसार राज्यातील प्रत्येक शाळेला किमान 50 झाडे लावावी लागणार आहेत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे आदेश दिला आहे. यंदाच्या पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेली हवामान बदल ही संकल्पना आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय समस्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे, त्यांच्यात पर्यावरणाबाबत जबाबदार वृत्ती, वर्तन रुजवण्याचा उद्देश आहे.

एक पेड माँ के नाम 3.0 ही वृक्षारोपण मोहीम शाळांतील इको क्लबच्या माध्यमातून देशभरातील शाळांमध्ये 5 जून ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत सन 2026-27 साठी 53 लाख 1 हजार 257 झाडे लावण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्राला देण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेने किमान 50 झाडे लावणे क्रमप्राप्त आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

झाडे लावण्यासाठी शाळेच्या आवारात पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास घरातील उपलब्ध जागा, रस्त्याच्या कडेला, योग्य सार्वजनिक जागा, शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडे लावता येऊ शकतात. तसेच, विद्यार्थ्यांनी आतापर्यंत लावलेल्या रोपांचे अस्तित्व, देखभाल आणि नियमित निरीक्षण सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, मिशन लाइफसाठी शाळांमध्ये इको क्लबची व्याप्ती वाढवणे, विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक समुदाय सहभाग वाढवण्यासाठी उपाययोजना करून 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करण्याबाबत सूचना द्याव्यात, असे डॉ. पालकर यांनी स्पष्ट केले आहे.

इको क्लबच्या माध्यमातून ग्रीन समर कॅम्प
शाळांतील इको क्लबच्या माध्यमातून 5 ते 30 जून या कालावधीत ग्रीन समर कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. त्यात शिक्षणाला निसर्गातील अनुभवांशी जोडण्याचा प्रयत्न आहे. हे शिबिर निरोगी जीवनशैलीचा अवलंब, शाश्वत अन्नप्रणाली, ई-कचरा कमी करणे, ऊर्चाबचत, पाणीबचत, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर थांबवणे या संकल्पनांवर आधारित असू शकते. शिबिरामध्ये या संकल्पनांशी संबंधित उपक्रम राबवावेत. उपक्रमांची माहिती, केलेल्या वृक्षारोपणाची माहिती http://ecoclubs.education.gov.in या संकेतस्थळावर दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Exit mobile version