| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील उल्हास नदीवर असलेल्या श्रीराम पुलावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे उगवत असतात. त्या झाडे झुडपांनी आता डोके वर काढले असून वाहतूकीसाठी ही झाडे डोकेदुखी ठरत आहेत.
उल्हास नदीवरील श्रीराम पुलावर बाजूला प्रचंड झाडी उगवली आहेत. ती झाडे आता पुलावर लोंबकळत असून पुलासह वाहनांसाठी हा भाग धोकादायक बनला आहे. त्यामुळे दरवर्षी अशा झाडांना मुळांपासून काढून टाकण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विकास चित्ते करीत असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा हा पूल असून त्यांच्या विभागाने ती झाडे झुडपे बाजूला करण्याची महत्वाची जबाबदारी असताना बांधकाम विभागाकडून कर्जत नगरपरिषदेकडे बोट दाखवले जाते. सातत्याने मागणी करुनही संबंधित विभागाकडून काम होत नाही. त्यात त्या झाडांमुळे पुलांच्या खांबांना देखील धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने ती झाडे बाजूला करावी, अशी मागणी विकास चित्ते करीत असतात. मात्र, त्या मागणीकडे शासन यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे.