आकर्षक, कमी वेळ, खर्च, जागा आणि पाण्यामध्ये वाढविते शोभा
। पाली-बेणसे । वार्ताहर ।
मुंबई पुण्याच्या सीमेवर असलेल्या रायगड जिल्ह्यात हजारो फार्महाऊस निर्माण झाले आहेत. अनेकांचे इथे सेकंड होम सुद्धा आहे. यातील अनेकजण आपल्या परसात किंवा घराच्या कोपर्यात, मोकळ्या जागेत, कमी पाण्याच्या ठिकाणी शुष्क बागेला (ऊशीशीीं ॠरीवशप) पसंती देताना दिसत आहेत. येथील स्थानिक देखील शुष्क बगीचा बनवून घेत आहेत. अतिशय आकर्षक, कमी वेळ, खर्च, जागा आणि कमी पाण्यामध्ये हा बगीचा घराची शोभा वाढवितो.
दगडगोटे आणि रेतीचा सर्वाधिक वापर शुष्क बगीचा बनविण्यासाठी होतो. जिथे झाडांना पाणी देणे अडचणीचे असते तिथे हा प्रयोग करता येतो. बाजारात किंवा नर्सरीत असे दगडगोटे, खडी रेती मिळते. पाणी कमी असलेल्या ठिकाणी अशा प्रकारचे साहित्य व झाडे वापरून सुरेख शुष्क बाग तयार करता येते. अशा बागेत अनावश्यक गवत सुद्धा कमी येते.
रेतीचे आणि खडीचे बरेच प्रकार आहेत जे सहज उपलब्ध होतात. जंगलातील मोठे दगड, नदीतील दगडगोटे, रेती, रंग आणि जुनी सुकलेली मुळे याचा वापर सुद्धा केला जातो. इतर साहित्यापेक्षा हे साहित्य वापरणे खूप सोपे असते. आणि खर्चही फार कमी येतो. वेगवेगळे आकार देऊन, किंवा एखादी थीम घेऊन शुष्क बगीचा केला जातो. दगडगोटे, खडी व रेती यांना आकर्षक रंग दिले जातात. आणि ठराविक ठिकाणी छोटी झाडे व गवत लावून हा शुष्क बगीचा तयार होतो. घराचा एखादा कोपरा सजवला तर चटकन लक्ष जाईल असे काम यात करता येते. ठळकपणे दिसणारे डिझाइन तयार केले तर बागेला एक वेगळा टच मिळतो. कातळ असले तरी ती जागा अशा पध्दतीने शुष्क बगीचा बनविण्यासाठी वापरता येते. जिथे खड्डे खोदू शकत नाही तिथं अगदी कमी वेळात शुष्क बागेचे काम होऊन जाते.
शुष्क किंवा खडीची बाग ही एक प्रकारची दगडी रचना आहे. जी स्टेपी लँडस्केपच्या स्वरूपात सुशोभित केलेली आहे. ही संकल्पना कमी झाडे आणि विविध सामग्रीच्या वापरावर आधारित आहे. शुष्क बाग तयार करण्याचे तंत्रज्ञान अगदी सोपे असले तरी कल्पकता व तज्ञांची गरज लागते. कमी वेळेत, खर्चात व जागेत ते करता येते. त्यामुळे जिल्ह्यात सध्या अनेक जण असे शुष्क बाग बनवून घेत आहेत.
अमित निंबाळकर, लँडस्केप तज्ञ
अतिशय आकर्षक व विविध प्रकारचे शुष्क बगीचा बनवीता येतात. बनविण्यासाठी खर्च कमी येतो. देखभालीची जास्त गरज नाही. बगीचाची हौस व छंद सुद्धा पूर्ण होतो आणि घराला शोभा देखील येते. म्हणून अशा प्रकारचा बगीचा बनवून घेतला आहे. शुष्क बगीचा बनविण्याचा पर्याय अनेक बागकाम करणारे सुचवतात ते योग्य आहे.
राजीव खन्ना, कुंभारघर, सुधागड