। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान घाटातील अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी (दि. 5) दुपारच्या सुमारास पुन्हा एक अपघात घडला आहे. माथेरान घाटात नेरळ-जुमापट्टी स्थानकाच्या वरील वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली.
एका नामांकित वाहननिर्मिती कंपनीच्या कारची ट्रायल टेस्टिंग सुरू असताना हा अपघात झाला. घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन लोखंडी सुरक्षा रेलिंग तोडत थेट खड्ड्यात अडकली. यावेळी कारमध्ये तीन तरुण प्रवास करत होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही; मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात तरुण थोडक्यात बचावले असून, पुन्हा एकदा माथेरान घाटातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.







