| अलिबाग | प्रतिनिधी |
‘सरकार आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महावितरणने मागील दोन महिन्यांत 157 आदिवासी वाड्यांमधील 2 हजार 44 ठिकाणी नवीन वीजजोडणी केली आहे. मात्र, आजही एक हजार 433 आदिवाड्यांवर वीज पोहोचली नसल्याने या वाड्या अंधारातच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, ज्या आदिवासी, ठाकूर वाड्यांमध्ये वीज पोहोचलेली नाही, त्या ठिकाणच्या आदिवासी बांधवांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज नसल्याने या वाड्यांमध्ये अंधारमय जीवन निर्माण झाले होते. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरीदेखील आजही दुर्गम भागात राहणारा आदिवासी समाज विजेच्या प्रतिक्षेत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वीज नसल्याने तेथील मुलांना अभ्यास करण्यास अडचणी येत होत्या. रात्रीच्यावेळी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता आय.ए. मुलाणी यांनी पुढाकार घेत आदिवासी वाड्यांमध्ये वीज पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले.
पेण येथील आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील आदिवासीवाड्यांची माहिती घेतली. वाड्यांमध्ये स्वतः जाऊन तेथील पाहणी करण्यात आली. या सर्वेक्षणातून ज्या वाड्यांमध्ये वीज पोहोचली नाही, त्या ठिकाणी वीज पोहचविण्यासाठी सुरुवात केली. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने अर्ज भरले. त्यासाठी लागणारी कागदपत्रांची पूतर्ता करून आदिवासी वाड्यांमध्ये वीजपुरवठा करून दिला. सरकार आपल्या दारी या उपक्रमातून त्यांनी ही मोहीम हाती घेतली. 157 वाड्यांमध्ये दोन हजार 44 वीज कनेक्शन नव्याने जोडण्यात आले. देश स्वातंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, आजही अनेकवाड्या विजेविना असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबई शहराला लागून असलेल्या पनवेलमधील 125 ठिकाणी अजूनही वीज पोहोचली नाही. माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरात 127 व रोहा परिसरातील एक हजार 90 ठिकाणी वीज न पोहोचल्याने अनेकांना आजही अंधारात राहण्याची वेळ आली आहे. याबाबत आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला आहिरराव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
दोन महिन्यांमध्ये दोन हजारांहून अधिक ठिकाणी नवीन वीजजोडणी करण्यात आली आहे. सरकार आपल्या दारी या उपक्रमातून प्रत्यक्षात लाभार्थ्यांचे अर्ज भरण्यापासून त्यांना लाभ मिळेपर्यंत सर्व प्रक्रिया कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. उर्वरित चौदाशे वीजजोडणीचे काम सुरू असून, महिनाभरात पूर्ण होईल.
श्री. मुलानी, अधीक्षक अभियंता
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष रोहा विभागात एक हजारांहून अधिक ठिकाणी वीजजोडणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे 50 हून अधिक वाड्यांना विजेची प्रतीक्षा लागून राहिली असल्याचे समोर आले आहे. याच तालुक्यात खासदार, आमदार, मंत्री असतानादेखील येथील आदिवासी बांधव अंधारात चाचपडत आहे, यापेक्षा दुर्दैव काय? त्यामुळे लोकप्रतिनिधी करतात काय, असा प्रश्नही विचारला जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे अपयश यातून अधोरेखित होत आहे.