इर्शाळवाडी आपदग्रस्तांना आदिवासी विभागाची मदत

संसार किटचे वाटप सुरु

| रायगड | खास प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने येथील कुटूंबांचे संसार उध्वस्थ झाले आहेत. केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून आदिवासी विकास प्रकल्प विभागाने 41 कुटूंबासाठी 41 लाख रुपये दिले आहेत. त्या माध्यमातून 41 कुटूंबांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे किट वाटण्यात येत आहे. त्यामध्ये संसारासाठी लागणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे.

19 जुलै रोजी इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने 27 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे, तर अद्यापही 57 जण बेपत्ता आहेत. आनंदाने राहणाऱ्या येथील नागरिकांवर काळाने घाला घातल्याने त्यांचे आयुष्यच उध्वस्थ झाले आहे. येथील नागरिकांचे आयुष्य रस्त्यावर आले आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्यांच्या नातेवाईक तसेच बचावलेल्या कुटूंबाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच सांगितले आहे.

इर्शाळवाडीतील नागरिकांना मदत करण्यासाठी विविध सामाजिक संस्था, संघटना पुढे येत आहेत. पालक गमावलेल्या मुलांचे पालकत्व देखील घेण्याची तयारी या वेळी दाखवण्यात आली आहे. 41 कुटूंबांतील नागरिकांचे आयुष्य पुन्हा स्थिरस्थावर करण्याठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून आदिवासी विकास प्रकल्प विभागाने 41 कुटूंबासाठी 41 लाख रुपये दिले आहेत. त्या माध्यमातून 41 कुटूंबांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे किट खालापूर तहसिलदार यांच्यामार्फत वाटण्यात येत आहे. त्यामध्ये संसारासाठी लागणऱ्या वस्तूंचा समावेश आहे.

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने 41 लाख रुपये खालापूर तहसिलदार कार्यालयाकडे वर्ग केले आहेत. त्यानुसार त्यांच्या मार्फत किट पुरवण्यात येत आहेत, असे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला आहिरराव यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले.

इर्शाळवाडीतील नागरिकांचे संसार उभे करण्यासाठी प्रशासन सर्वोतपरी मदत करत आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना मदत करत आहेत. आदिवासी विकास प्रकल्पाने दिलेल्या निधीतून तीन महिना पुरेल इतका किरणा माल, कपडे यासह अन्य साहित्य देण्याचे काम सुरु आहे.

अजित नैराळे, प्रांताधिकारी, कर्जत
Exit mobile version