आदिवासी मुलीने घडविला इतिहास

प्रियांका पिंगळा जिल्ह्यातील पहिली सिव्हील इंजिनिअर

| अलिबाग | प्रमोद जाधव |

आईवडिलांचे पाठबळ मिळाल्यावर मुलगी काय करू शकते हे डोंगरदऱ्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी ठाकूर समाजातील प्रियांका पिंगळा हिने दाखवून दिले आहे. या तरुणीने तीन वर्षे सिव्हील इंजिनिअरचा डिप्लोमा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. रायगड जिल्ह्यामधील ठाकूर समाजातील पहिली महिला सिव्हील इंजिनिअर म्हणून तिने पदवी मिळवली आहे. तिच्या या कामगिरीबद्दल शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, प्रियांकावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रियांका पिंगळा ही तरुणी अलिबाग तालुक्यातील गावठाण आदिवासी-ठाकूरवाडी येथील रहिवासी आहे. आदिवासी-ठाकूरवाडी ही दुर्गम भागात आहे.प्रियांकाचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण महाड येथील सांबरखिंड येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर पाचवी ते 12 वीपर्यंतचे शिक्षण अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील ना.ना. पाटील हायस्कूलमध्ये झाले. बारावीनंतर सरकारी नोकरीच्या शोधात जाण्यापेक्षा स्वतः व्यावसायिक बनण्याचे स्वप्न प्रियांकाने उराशी बाळगले. तिच्या या स्वप्नाला उभारी देण्याचे काम तिचे वडील कृष्णा पिंगळा यांनी केले. बारावीनंतर स्थापत्य इंजिनिअरचे शिक्षण घेण्याचा निर्णय तिने घेतला. नागोठणे परिसरातील वरवठणे येथील किशोरभाई जैन महाविद्यालयात तीन वर्षे स्थापत्य इंजिनिअर म्हणून शिक्षण पूर्ण केले. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात तिने यश संपादन केल्याने रायगड जिल्ह्यातील पहिली आदिवासी -ठाकूर समाजातील स्थापत्य इंजिनिअर म्हणून ठरली आहे.

प्रियांकाने खेळाच्या माध्यमातून अनेक बक्षिसे मिळविली आहेत. सांगली येथे झालेल्या खो-खो स्पर्धेमध्ये तिने उपकर्णधार म्हणून भूमिका बजावली आहे. खेळामध्ये पारंगत असलेल्या प्रियांकाने स्थापत्य इंजिनिअर या क्षेत्रातून भरारी घेण्याचा निर्णय घेतला असून, सध्या ती ऑटो कॅटमध्ये प्रवेश घेण्याच्या तयारीत आहे. प्रियांकाचे वडील हे रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागात अलिबागचे गट शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असून, आई गृहिणी आहे. तिच्या या उज्ज्वल यशामुळे आईवडिलांसह शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक, समाज, गाव, अलिबाग तालुका व संपूर्ण जिल्ह्याचे नावलौकिक झाले आहे.

पंडित पाटील यांच्याकडून कौतुक
प्रियांका पिंगळा हिच्या यशाबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे माजी आ. पंडित पाटील यांनी तिच्या पाठीवर शाबासकीची थाप देत मिळविलेल्या यशाचे कौतुक केले. आदिवासी-ठाकूर समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होत नावलौकिक करावे. यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचेही त्यांनी यावेळी जाहीर करत प्रियांकाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version