पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांचे आवाहन
। खरोशी । वार्ताहर ।
आदिवासी तरुणांनी पोलीस भरतीसह स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन पेण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले आहे. यासाठी अभ्यासिका सुरू केल्यास वेळोवेळी मार्गदर्शनासाठी वेळ देणार असल्याचेही यावेळी बागुल यांनी सांगितले.
सोमवारी (दि.14) ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्यावतीने पेण तालुक्यातील तांबडी आदिवासी वाडी येथे तरुणांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना आदिवासी समाजामध्ये पोलिसांबद्दल असलेली भीती कमी कशी करता येईल, तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी सहाययक पोलीस निरीक्षक राजपूत गोपनीय विभाग नरेश ठाकूर, पोलीस हवालदार कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील, राजेश रसाळ, राजू पाटील, सुनील वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत यांनी शासकीय सेवेसह पोलीस भरतीमध्ये आदिवासी समाजाला आरक्षण असते याबाबत माहिती देत पोलीस भरती प्रक्रिया कशी असते याबद्दलची माहिती देताना आदिवासी मुलं शरीर यष्टीने मजबूत असल्यामुळे ते फिजिकल टेस्टला उत्तीर्ण होतील. परंतु लेखी परीक्षेची तयारी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेश रसाळ यांनी केले.