आदिवासी युवकांनी हुतात्म्यांपासून प्रेरणा घ्यावी

डॉ. वैशाली पाटील यांचे प्रतिपादन


| पेण | वार्ताहर |

आजच्या घडीला भारतातील 18 ते 25 वयोगटातील 60 टक्क्यांपेक्षा जास्त युवक बेरोजगार आहेत. यामध्ये आदिवासी युवकांचा समावेश आहे. केवळ जंगल, जमीन, पाण्यातील मासेमारीवर उपजीविका करणे आता कठीण झालं आहे. दहावी, बारावी शिकून मजुरीवर पोट भरणाऱ्या युवकांना वैफल्य येत आहे, व्यावसायिक प्रशिक्षणाची जोड देण्याकरिता लागणारी माहिती, व्यवस्था व प्रशिक्षणाची परिणामकारकता याबाबत साशंकता मनात आहे म्हणून आदिवासी युवकांनी विचारपूर्वक भविष्याला दिशा देण्याची व हुतात्मा नाग्यापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. त्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पेण येथील कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळेस आदिवासी युवा कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख महिला नेत्या उपस्थित होत्या.

अंकुर ट्रस्ट तसेच विविध आदिवासी सामाजिक संस्थेंमार्फत दरवर्षी आदिवासी हुतात्मा नाग्या कातकरीचा स्मृतिप्रीत्यर्थ विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. 25 सप्टेंबर 1930 साली झालेल्या या जंगल सत्याग्रहात बलिदान दिलेल्या तरूण हुतात्मा नाग्याचे नाव चिरनेर येथील मूळ स्तंभावर येण्यासाठी 25 वर्षांपूर्वी डॉ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेण तालुक्यातील कातकरी युवक व महिलांनी मोठी चळवळ सुरू केली होती.आता या दिवशी केवळ पेणमध्येच नाहीतर, महाराष्ट्रात सर्वत्र कातकरी आदिवासी हा दिवस पाळतात. अंकुर ट्रस्टमार्फत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आदिवासी कातकरी समाज कार्यकर्ते बाळाराम नाईक, सरिता जाधव व भारती पवार, आदिवासी महाविद्यालयीन विद्यार्थी आकाश पवार, अंजली वाघमारे यांनी हुताम्याच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले.

अंकुर ट्रस्ट संस्थेमार्फत सुरू असलेल्या आश्रमातील मुलांनी विविध देशभक्तिपर गीते गाऊन आदिवासी हौतात्म्यास श्रध्दांजली वाहिली. आज हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या स्मरणार्थ आदिवासी समाजाचे नेते संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजातील युवकांनी मोटारसायकल रॅली काढून आपल्या हुतात्म्यांना मानवंदना दिली.

Exit mobile version