आदिवासींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल

आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा

| अलिबाग | प्रतिनिधी |

आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाने सोमवारी हल्लाबोल केला. रायगड बाजारपासून काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाने शहर दुमदुमून गेले. आदिवासी अधिकार संघर्ष समितीचे मालू निरगुडे, भगवान नाईक, दिलीप डाके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती पनवेल सदस्य बी.पी. लांडगे, आदिवासी अधिकार संघर्ष समिती संतोष चाळके, कृष्णा वाघमारे यांच्यासह पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, पेण, पाली, रोहा, अलिबाग, महाड, म्हसळा, श्रीवर्धन तळा, मुरुड, माणगाव इत्यादी तालुक्यातील ज्येष्ठ पदाधिकारी व सुमारे पाच हजार आदिवासी बांधव सहभागी झाले होते.

आदिवासी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवावे, धनगर समाजाला त्यात समाविष्ट करण्यात येऊ नये, ही त्यांची प्रमुख मागणी होती. याखेरीज सरकारी नोकरीच्या खासगीकरणासंदर्भात काढण्यात आलेले परिपत्रक व शासन निर्णय मागे घेण्यात यावे, 62,000 शाळांचे खासगीकरण थांबविण्यात यावे, रायगड जिल्ह्यामधील स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रत्यक्ष ताबेकब्जात व वहिवाटीत असलेल्या दळी जमिनींचे स्वतंत्र सातबारे त्वरित देण्यात यावे, जिल्ह्यात पेसा कायदा लागू करून त्याची अंमलजावणी करण्यात यावी, खासगी क्षेत्रात एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गांना आरक्षण द्यावे आदी त्यांच्या अन्य मागण्या आहेत.

सकाळपासून जमावाला सुरुवात
मोर्चाची वेळ अकरा वाजण्याची दिली होती. दहा वाजल्यापासून वेगवेगळ्या भागातून आदिवासी समाज अलिबागमधील रायगड बाजार परिसरात जमाव करू लागला. दुपारी बारानंतर प्रचंड गर्दी होऊ लागली. दुपारी एक वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघू लागला. ‌‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे', ‌‘मूलनिवासी आदिवासी समाज जागा हो' अशा घोषणा देत मोर्चा उन्हाचे चटके खात दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाल्यानंतर वेगवेगळ्या पुढाऱ्यांनी भाषणे केली.
Exit mobile version