रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन
नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात असलेल्या आदिवासी वाड्यांना जाणारा रस्ता वन जमिनीमुळे रखडला आहे.वर्षानुवर्षे रस्त्याची मागणी पुर्ण होत नसल्याने सहा आदिवासी वाड्यांमधील आदिवासी लोकांनी नेरळ-माथेरान घाटरस्त्यातील वाहतूक अर्धा तास बंद पाडली. दरम्यान,आदिवासी समाजातील महिला यांनी त्या आंदोलनाच्या ठिकाणी आदिवासी नृत्य करीत आंदोलन अधिक काळ टिकवून ठेवले.
माथेरानच्या डोंगरात असलेल्या जुम्मापट्टी धनगर वाडा पासून बेकरेवाडी, आसलवाडी,नाण्याचा माळ आणि मन्या धनगरवाडा या आदिवासी वाड्या यांना जोडणारा रस्ता शासन करीत नाही.त्यामुळे स्थानिक आदिवासी लोकांनी श्रमदान करून आपल्या वाडीत पोहचण्यासाठी रस्ता बनवला.मात्र हा रस्ता दरवर्षी पावसाळ्यात वाहून जातो आणि त्यामुळे त्या भागातील लोकांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्याअभावी जाता येत नाही.त्यामुळे स्थानिक आदिवासी कार्यकर्ते जैतु पारधी आणि गणेश पारधी यांनी रस्त्यासाठी आतापर्यंत चारवेळा उपोषणे केली आहेत.प्रत्येकवेळी शासनाकडून उपोषण कर्ते यांची उपेक्षा झाली असून आजपर्यंत रस्ता होऊ शकला नाही. त्यामुळे या आदिवासी लोकांनी शनिवारी 16 ऑक्टोबर रोजी रस्ता रोको आंदोलन केले. जैतु पारधी,गणेश पारधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे नेरळ-माथेरान घाटरस्ता बंद पडला होता.आदिवासी महिला रस्त्यावर उतरून आदिवासी नृत्य आणि आदिवासी गाणी सादर करीत होते.
पर्यटकांनी लुटला आनंद
शनिवार असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक माथेरान येथे या रस्त्याने जात होते.त्या पर्यटकांची वाहने साधारण अर्धा तास थांबून राहिली होती.मात्र त्या वाहनांमधील पर्यटक यांनी रस्त्यावरील आंदोलन एन्जॉय केले.आदिवासी नृत्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक हे आपल्या वाहनातून उतरून आल्याचे दिसून आले.
यावेळी आदिवासी सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष बुधाजी हिंदोळा, जिल्हा सरचिटणीस गणेश पारधी,जिल्हा उपाध्यक्ष भगवान भगत,तसेच विभागीय अध्यक्ष सुरेश दरवडा,यांच्यासह ग्रामस्थ बाळू पारधी, बूधाजी निरूगडे,बूधाजी पारधी,बाळू सांबरी, लक्ष्मण सांबरी,जोमा निरगूडे, सुनिल पारधी आणि महिला उपस्थित होत्या.त्यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, तसेच अन्य पोलीस यावेळी बंदोबस्त करण्यासाठी उपस्थित होते.त्यावेळी पोलीस निरीक्षक तेंडुलकर यांनी आदिवासी लोकांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन करताना आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता तयार करण्यासाठी स्वतः शासनाच्या प्रतिनिधी यांना तात्काळ आजच सुचविले जाईल असे आश्वासन दिले.