रस्त्यासाठी आदिवासींचे आजपासून उपोषण

रस्ता खोदणार्‍यांवर कारवाईची मागणी
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्याचे शेवटचे असलेल्या बेडीसगाव आणि परिसरातील नऊ आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता अज्ञात लोकांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने उखडून लावत गायब केला आहे. त्याबद्दल ताकारी देऊन महिना लोटला तरी शासनाच्या यंत्रणेकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, त्यामुळे स्थानिक आदिवासींनी सोमवार, 4 एप्रिलपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान, आदिवासी लोकांची वहिवाट असलेला रस्ता खोदून गायब करणार्‍यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करावा आणि आदिवासी लोकांचा पूर्वापार रस्ता शासनाने तयार करून द्यावा, या मागणीसाठी हे उपोषण केले जाणार आहे.
बेडीसगाव या गावाकडे जाण्यासाठी शासनाच्या रायगड जिल्हा परिषदेकडून रस्ता बनविण्यात आला होता. त्यानंतर 15 वर्षांनी या रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम मंजूर झाले आहे. मात्र, रस्त्याचे काम सुरु होण्याआधी बेडीसगावकडे जाणारा 300 मीटर 4 मार्च रोजी रात्री वांगणी परिसरातील लोकांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने उखडून लावून गायब केला होता. मात्र, नऊ आदिवासीवाड्यांकडे जाणारा रस्ता गायब झाल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. वाहने घराजवळ ठेवावी लागत आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि आदिवासी लोकांनी नेरळ पोलीस ठाणे येथे 6 मार्च रोजी येऊन निवेदन देऊन वांगणी परिसरातील काही लोकांची नावे नोंद करीत त्यांनीच रस्ता गायब केला असल्याचे ठामपणे सांगत त्या सर्वांवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्या मागणीला महिना होत आला असून, कर्जत पोलीस उपाधीक्षक आणि नेरळ पोलीस यांच्याकडून कोणतीही कार्यवाही केली नाही. त्याचवेळी महिना झाला तरी रस्त्याची मालकी असलेला जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि या रस्त्याचे डांबरीकरण करणार्‍या महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा यांनी त्या रस्त्याची दुरुस्तीदेखील केली नाही.

आंदोलनाचा निर्धार
स्थानिक आदिवासी आणि कर्जत तालुका आदिवासी सेवासंघ यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार 4 एप्रिल पासून आदिवासी कार्यकर्ते आणि शेतकरी उपोषणाला बसणार असून, रस्ता खोदणार्‍या व्यक्तींवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट खाली गुन्हा दाखल करावा आणि रस्ता पूर्वी होता तसाच तयार करून घ्यावा, अशी मागणी उपोषणकर्ते यांची आहे. शेलू ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि बेडीसगावचे ग्रामस्थ मंगळ दरवडा तसेच स्थानिक शेतकरी आणि आदिवासी सेवा संघाचे रायगड जिल्हा सचिव गणेश पारधी आणि कर्जत तालुका अध्यक्ष जैतू पारधी हे उपोषणाला बसणार आहेत. कर्जत तहसील कार्यालयाबाहेर हे उपोषण होणार असल्याची माहिती दिली आहे.

Exit mobile version