शासनाचे दुर्लक्ष; आमरण उपोषणाचा इशारा
| पेण | प्रतिनिधी |
पेण ते पाबळ खोरे हा मार्ग गेली तीन पिढ्या पाबळ खोऱ्यातील तरूण एकत्र येऊन श्रमदानातून करत आहेत. स्वातंत्र्याची 75 उलटनूही अद्याप येथील 22 वाड्यांना जोडणारा रस्ता नसल्याने येथील आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. शिवाय, रस्त्याअभावी अबालवृद्ध, गरोदर स्त्रिया, शाळकरी मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आजारी व्यक्तीस लाकडाची डोली करुन डोंगर तुडवत आरोग्य केंद्र गाठावे लागत आहे. येथील आदिवासींच्या पाचवीला पुजलेली ही मरणयातना कधी थांबणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
दरम्यान, वडखळ मार्गे पाबळ खोऱ्यात जायचे झाले तर 24 मीटरचे अंतर पार करावे लागते. तर पेण वडगावमार्गे पाबळ खोऱ्यात जायचे झाले तर 4 किलोमीटर आणि जिर्णेचा विचार केल्यास अडीच किलोमीटर एवढे अंतर आहे. जिर्णे खोऱ्यातील कुरनाड आणि बारशेत वाडी येथील 50 तरूणांनी सालाबादप्रमाणे श्रमदानातून हा रस्ता तयार करायला सुरूवात केली. त्यावेळी कृषीवलचे प्रतिनिधी तेथे पोहचून माजी उपसरपंच रामा ढुंमणा व सामाजिक कार्यकर्ते संतोष वाघमारे यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर विदारक सत्य समोर आले.
रामा ढुंमणा यांनी सांगितले की, गेली 3 पिढ्या आम्ही या रस्त्याने पेण शहरात जात आहोत. मी स्वतः 70 वर्षांचा असून, कित्येक कार्यालयांचे उंबरठे या रस्त्यासाठी झिजवले आहेत. परंतु या रस्त्याला न्याय कुणीच देऊ शकला नाही. या रस्त्याचा उपयोग आम्ही यासाठी करतो की, वेळ आणि पैसा आमचा वाचतो. तसेच, बाजारहाट करण्याच्या दृष्टीने हा आम्हाला रस्ता जवळचा वाटतो. आमच्या विभागामध्ये सर्रास ठाकूर समाज हे भाजीपाल्याचे मळे करत असतात, त्यामुळे पावसाळ्यात तर रात्री एकच्या सुमारास आम्ही या रस्त्याने डोक्यावर भाजीच्या पाट्या घेऊन पेणच्या बाजारात जात असतो. तसेच, पावसाळ्यात एखाद्या माता-भगिनीला प्रसूतीच्या वेळेला याच रस्त्यातून झोळीने आम्हाला सरकारी दवाखान्यापर्यंत न्यावं लागत. उन्हाळाच्या दिवसात आम्ही श्रमदानातून हा रस्ता करतो. तो पाच महिने आम्हाला वापरायला मिळतो; परंतु नंतर आमची अवस्था खूपच बिकट असते.
संतोष वाघमारे यांनी सांगितले की, जेव्हापासून जिर्णे ग्रामपंचायत अस्तित्वात आली, तेव्हापासून मी युध्दपातळीवर या रस्त्याचा पाठपुरावा करत आहे. मात्र, शासनाच्या जाचक अटींमुळे या रस्त्याला निधी उपलब्ध होत नाही. हा रस्ता झाल्यास जिर्णे, पाबळ खोऱ्यातील नागरिकांचा रस्त्याअभावी आलेला वनवास संपेल आणि येथील तरूणांना जास्तीच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तरी या रस्त्याला योग्य ती निधी उपलब्ध करून शासनाने या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी शेवटी शासनाला विनंती केली.
उपोषणाचा इशारा जर येत्या तीन महिन्यात वडगाव, जिर्णे रस्त्याला निधी मिळाला नाही, रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर प्रांत कार्यालयासमोर आम्ही सर्व 22 वाड्यांचे आदिवासी अमरण उपोषणाला बसणार, असा इशारा जिर्ण्याचे माजी उपसरपंच रामा ढुंमणा यांनी कृषीवलच्या माध्यमातून शासनाला इशारा दिला आहे.