| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
कुणबी समाजाचे ज्येष्ठ समाजनेते व थोर समाजसेवक ग. स. कातकर यांच्या 24 व्या पुण्यतिथीनिमित्त श्रीवर्धन येथे विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कुणबी समाजोन्नती संघ, श्रीवर्धन यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भव्य रक्तदान शिबीर, रुग्णांसाठी फलवाटप आणि महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबीर अशा उपक्रमांचा समावेश होता. समाजातील विविध स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली.
ग.स. कातकर यांनी आपल्या आयुष्यभर समाजातील गरजू, शेतकरी आणि वंचित घटकांच्या मदतीसाठी कार्य केले. समाजाला एकत्र आणणे, शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा हात देणे हे त्यांचे जीवनकार्य होते. त्यांच्या या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुणबी समाजोन्नती संघ दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत असतो. पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ या भावनेतून युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. शिबिरासाठी वैद्यकीय तज्ज्ञ आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे विशेष पथक उपस्थित होते. संकलित झालेले रक्त गरजू रुग्णांच्या उपचारासाठी सरकारी रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात आले.रक्तदानानंतर प्रत्येक रक्तदात्याला संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह व आकर्षक बॅग देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी ग. स. कातकर साहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. समाजात एकोपा टिकवून ठेवणे, शिक्षणाचा प्रसार करणे आणि गरजूंना मदतीचा हात देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रुग्णांसाठी फळांचे वाटप
पुण्यतिथीनिमित्त श्रीवर्धन येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. रुग्णांना भेटून त्यांची विचारपूस करण्यात आली. तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
महिला दिनानिमित्त आरोग्य मार्गदर्शन
8 मार्च हा जागतिक महिला दिन असल्यामुळे महिलांसाठी विशेष आरोग्य मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात डॉ. ढवळे यांनी महिलांना विविध आरोग्यविषयक समस्या, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, संतुलित आहाराचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैली याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असून नियमित तपासणी आणि योग्य आहार यामुळे अनेक आजार टाळता येतात, असे त्यांनी यावेळी सांगितले.
