पक्षाची निष्ठा व झेंडा पुढे नेणे हीच खरी मीनाक्षी पाटील यांना आदरांजली

शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या मीनाक्षी पाटील यांचा पक्षाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता. त्या एक उत्तम वक्त्या होत्या. राजकारणात त्यांची स्वतः एक वेगळी पक्कड निर्माण केली होती. अभ्यास शिबिरातून तयार झालेल्या त्या नेत्या होत्या. पक्षाबाबत त्यांची एक वेगळी निष्ठा होती. पक्षाची निष्ठा व झेंडा पुढे नेणे, हीच खरी मीनाक्षी पाटील यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले.

माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि. 13) शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी विद्यार्थी संघटना अलिबाग, पुरोगामी युवक संघटना अलिबाग, शेकाप सांस्कृतिक सेल अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मा. राज्यमंत्री स्व. मीनाक्षीताई वक्तृत्व करंडक 2025 जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धा शेतकरी भवनमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या.

याप्रसंगी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, मीनाक्षी पाटील यांची वक्तृत्व ही ओळख होती. मीनाक्षी पाटील यांनी राजकीय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने एक वेगळी पक्कड निर्माण केली होती. राज्यात त्यांचा एक दबदबा होता. त्यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा ठेवून एक संकल्पना अंमलात आणली आहे. त्यांच्या विचारांचा वारसा असाच पुढे नेण्याचे काम आपण सर्वांनी करूया हीच खरी त्यांना आदरांजली असणार आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

स्पर्धेचा बोलबाला राज्यात पोहोचवा: ॲड. मानसी म्हात्रे
मीनाक्षी पाटील यांनी पुरोगामी विचार जपला आणि रुजविण्याचे काम केले. शेतकरी कामगार पक्षासाठी समर्पित आयुष्य जगल्या. शेकापच्या नेत्या स्व. मीनाक्षी पाटील या प्रभावी वक्त्या होत्या. पाटील घराण्याला लाभलेले एक रत्न होते. वक्तृत्व आणि त्यातून साधलेले नेतृत्व म्हणजे मीनाक्षी पाटील होय. त्यांच्या जयंतीनिमित्त अलिबागमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचा बोलबाला राज्यात पोहोचला पाहिजे. या स्पर्धेला उंची देण्याचा प्रयत्न करण्यात यावा, असे प्रतिपादन शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी केले.
मीनाक्षी पाटील यांचा आदर्श कायम ठेवा: प्रदीप नाईक
शेकापच्या नेत्या स्व. मीनाक्षी पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. योग्य नियोजन व व्यवस्थापन आयोजकांनी केले आहे. शेकापचे नेते जयंत पाटील यांनी पक्षाच्या वेगवेगळ्या आघाड्या निर्माण केल्या. प्रत्येक सेलने चांगले काम करावे, ही जयंत पाटील यांची इच्छा आहे. त्या पद्धतीने पुरोगामी विद्यार्थी संघटनेसह पुरोगामी युवक आणि सांस्कृतिक सेलने काम करण्यास सुरुवात केली आहे. मीनाक्षी पाटील यांचा आदर्श कायम घेण्यासारखा होता. आपल्या वक्तृत्वाने एक वेगळी छाप टाकण्याची कला त्यांच्यामध्ये होती. शेकापच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. वक्तृत्व हा त्यांचा आवडता विषय होता. त्यांचे भाषण एक पर्वणी व मेजवानीच होती. त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने काम करावे, असे शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक म्हणाले.
वक्तृत्वामध्ये चांगली प्रगती करता येते: ॲड. गौतम पाटील
शेकापच्या नेत्या स्व. मीनाक्षी पाटील यांंचे पक्षासाठी मोलाचे योगदान राहिले आहे. वक्तृत्व कसे असावे, हे त्यांच्याकडून शिकलो. त्यांची आठवण ही कायमच स्मरणात राहण्यासारखी आहे. वक्तृत्व स्पर्धा घेऊन मोबाईलच्या जगतामध्ये वावरणाऱ्या पिढीसाठी शेकापने एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. मोबाईल फोन खाली ठेवून प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला पाहिजे. वक्तृत्व करताना सुरुवातीला चुका होतात. या चुका सुधारून वक्तृत्वामध्ये चांगली प्रगती करता येते, असे शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांनी सांगितले.
वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि.13) अलिबागमध्ये शेतकरी भवन येथे मा. राज्यमंत्री स्व. मीनाक्षीताई वक्तृत्व करंडक 2025 जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी शेकाप ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, शंकरराव म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप तालुका माजी चिटणीस अनिल शांताराम पाटील, अलिबाग पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल गोमा पाटील, शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी विद्यार्थी संघटना अलिबाग, पुरोगामी युवक संघटना अलिबाग, शेकाप सांस्कृतिक सेलचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते व स्पर्धेक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मीनाक्षी पाटील यांना आगळीवेगळी आदरांजली
शेकापच्या माजी राज्यमंत्री दिवंगत मीनाक्षी पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी विद्यार्थी संघटना अलिबाग, पुरोगामी युवक संघटना अलिबाग, शेकाप सांस्कृतिक सेल अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मा. राज्यमंत्री स्व. मीनाक्षीताई वक्तृत्व करंडक 2025 स्पर्धा घेण्यात आली. मीनाक्षी पाटील या चांगल्या वक्त्या होत्या. त्यांच्या कार्याची माहिती जनतेला मिळावी म्हणून वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या. ही स्पर्धा घेऊन मीनाक्षी पाटील यांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली. सुरुवातीला स्व. मीनाक्षी पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्याची माहिती उपस्थितीत मान्यवरांनी दिली.
Exit mobile version