| तळा | प्रतिनिधी |
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान देणारे क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (दि.23) ‘शहीद दिन’निमित्त जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स, तळा येथे भावपूर्ण वातावरणात आदरांजली कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन बंगाळे यांच्या हस्ते शहिदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून थोर क्रांतिकारकांना श्रद्धांजली अर्पण केली.
आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ. बंगाळे यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे केवळ क्रांतिकारक नसून तरुणांसाठी प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. त्यांनी अत्यंत कमी वयात देशासाठी प्राणार्पण केले असून त्यांच्या विचारांमधून देशभक्ती, अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आणि समाजपरिवर्तनाची प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अमोल निकम यांनी शहीदांच्या कार्याचा आढावा घेताना 23 मार्च 1931 रोजी लाहोर तुरुंगात तिघांना फाशी देण्यात आल्याची ऐतिहासिक माहिती दिली. “इन्कलाब जिंदाबाद” या घोषणेने स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. भगतसिंग यांचे विचारमूल्य, राजगुरूंचे धाडस आणि सुखदेव यांचे संघटन कौशल्य आजच्या तरुणांसाठी आदर्श असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. जयदीप देवरे, डॉ. विजय रायकर, तसेच आयटी व सीएस विभाग प्रमुख प्रा. मनस्वी वाडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे आणि विचारांद्वारे शहीदांना अभिवादन केले. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल निकम यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिक्षणमहर्षी डॉ. नंदकुमार वेदक, सचिव उन्मेश वेदक व बी. प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांचे मार्गदर्शन लाभले.






