। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील दिवीपारंगी येथे श्री जाखमाता देवीचा त्रैवार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आला आहे. हा उत्सव शुक्रवारी (दि.18) सकाळपासून संध्याकाळपर्यंत होणार आहे. यानिमित्त भजनांसह वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दिवीपारंगीमधील ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, मुंबई रहिवासी मंडळाच्यावतीने हा सोहळा पार पडणार आहे.
श्री जाखमाता देवी नवसाला पावणारी देवी अशी धारणा आहे. माऊलीच्या पाटाचे विसर्जन समुद्रात केले जाते. समुद्रात ओहटीच्या पाण्यावर हा पाट सोडला जातो. तोच पाट दुसर्या दिवशी भरतीच्या पाण्यावर परत त्याच ठिकाणी येतो. ही शाश्वती पहाण्यासाठी लाखो भाविक येतात. गेल्या अनेक वर्षाची परंपरा आजही याठिकाणी पहावयास मिळत असल्याची माहिती तेथील ग्रामस्थांनी दिली आहे. यावेळी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काकड आरती, त्यानंतर अभिषेक महाआरती, संगित प्रासादिक भजन, दुपारी दोनंतर श्रींच्या पालखींची मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखीसोबत लाठीकाठी व मल्लखांब, लेझीम पथक, ताशे-नगारे, बेंजोपथके, खालु बाजा, वारकरी भजने, तसेच सामाजिक पौराणिक चित्ररथ, विविध प्रकारची वेशभुषा सोंगण्याच्या स्वरुपात पहावयास मिळणार आहे. सायंकाळी साडेसहानंतर पालखी मिरवणुकीचा विसर्जन सोहळा होणार आहे.
दरम्यान, सकाळपासून संध्याकाळपर्यंत हनुमान प्रासादिक भजन मंडळ दिवीपारंगी, श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ भोनंग, श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ बापळे, श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ चिंचोटी, श्री संगमेश्वर प्रासादिक भजन मंडळ मुळे, श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ कुरुळ तसेच श्री पंत महाराज प्रासादिक भजन कार्ले यांचे भजन असणार आहेत.