तळोजा कारागृहात घेतला गळफास
। ठाणे । प्रतिनिधी ।
कल्याणमधील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या प्रकरणात तळोजा जेलमध्ये बंद असणाऱ्या आरोपी विशाल गवळीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशाल गवळी याने रविवारी (दि. 13) पहाटे तुरुंगातील शौचालयात गळफास लावून घेतल्याने त्याचा मृ्त्यू झाल्याची माहिती तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात विशाल गवळीने एका अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर तिचा निर्घृणपणे खून केला आणि तिचा मृतदेह एका बॅगेमध्ये कोंबून ठेवला. रिक्षाचालक असलेल्या विशाल गवळी याच्याविरोधात विनयभंगाचे 5 गुन्हे दाखल होते. त्याच्या या राक्षसी कृत्यानंतर चिमुरडीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याची बायको साक्षी हिनेदेखील मदत केली होती. त्याने मित्राच्या रिक्षातून मृतदेह बापगावला बॅगेत नेला आणि फेकून दिला होता. तिथून पळून तो बुलढाण्याला गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.
गेल्या तीन महिन्यांपासून आरोपी विशाल गवळी तळोजा कारागृहात होता. रविवारी पहाटेच्या सुमारास त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. विशाल गवळी हा कल्याणमधील सराईत गुंड होता. त्याच्यावर बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड करणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होती.