| पनवेल | प्रतिनिधी |
नव्याने काम चालू असलेल्या पेट्रोलपंपामध्ये असलेल्या एक लाख रुपये किमतीच्या कॉपर वायरची चोरी करणाऱ्या त्रिकुटाला पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून काही प्रमाणात चोरीला गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी हस्तगत करण्यात आली आहे.
पनवेल तालुक्यातील सोमाटणे गावाच्या हद्दीत नव्याने काम चालू असलेल्या पेट्रोलपंपामध्ये बसवण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून अज्ञात चोरट्यांनी सुमरे एक लाख रुपयांच्या कॉपर वायरची चोरी केल्याची घटना घडली होती. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्य्क पोलीस निरीक्षक गिजे, पोलीस उपनिरीक्षक राजपूत, पोहवा धुमाळ, देवरे, कुदळे, बाबर, तांडेल, महारसे, भगत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने आरोपी अनिल यादव (25), अवधेश मोर्या (19) आणि विष्णु चौरासिया (44) तिघेही राहणार नेरेपाडा यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून काही प्रमाणात चोरीला गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी हस्तगत केली आहे.







