| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील चर्च व खारघर येथील एका बंगल्यामध्ये केलेल्या 52 लाखांच्या घरफोडी प्रकरणी त्रिकुटाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पनवेल शहरातील एका चर्चमध्ये त्रिकुटाने चोरी करून दानपेटीमधील रोख रक्कम चोरुन नेली होती. त्याचप्रमाणे खारघर येथील साईकुंज बंगल्यामध्ये सुद्धा या त्रिकुटाने घरफोडी करून रोख रक्कम व दागिने असा मिळून जवळपास 52 लाखांचा ऐवज चोरुन नेला होता.
याबाबतच्या तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाणे व खारघर पोलीस ठाणे येथे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक या आरोपींचा कसून शोध घेत असताना हे आरोपी तळोजा भागात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी अग्र धनबहाद्दुर बिस्ट उर्फ पवन (38), धनबीरे राहुले विसुक्रमा (31) व नवीन रतन विश्वकर्मा (36) या त्रिकुटाला ताब्यात घेतले असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच, त्यांच्याकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.







