| अलिबाग | प्रतिनिधी |
महिलांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी नुकतीच अलिबाग येथील स्पर्धा विश्व अकॅडमीला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी संस्थेच्या प्रमुख तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी व संचालिका सुचिता साळवी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कार्याची विशेष स्तुती केली.
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन देण्याचे महत्त्वाचे कार्य स्पर्धा विश्व अकॅडमी करत आहे. या संस्थेने अल्पावधीत गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थी घडवले असून, अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या कार्याची माहिती मिळताच तृप्ती देसाई यांनी स्वतः अलिबागला भेट देऊन संस्थेचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. यावेळी तृप्ती देसाई यांनी तपस्वी गोंधळी व सुचिता साळवी यांच्यासोबत चर्चा करत महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांच्याकडून होणाऱ्या योगदानाचे भरभरून कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करत स्वप्न मोठं ठेवण्याचा संदेश देखील दिला. या भेटीत संस्थेच्या इतर शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत तृप्ती देसाई यांनी स्पर्धा विश्व अकॅडेमीच्या कार्यपद्धतीचा गौरव केला.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी समाजाप्रती आपले देणे लागते म्हणून अधिकारी झाल्यानंतर सुद्धा कायम मातीशी जुळवून राहता आलं पाहिजे. यश मिळवण्याकरिता सतत प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. बऱ्याचदा आपण करत असलेल्या कार्याची कोणी तसदी देखील घेत नाही. मात्र, स्वतःवर विश्वास ठेवत अविरत मेहनत करण्याची तयारी आणि जास्तीत जास्त कृतीवर भर दिल्यास आपण आपल्याला हवे असलेले यश निश्चित मिळवू शकतो.
तृप्ती देसाई,
अध्यक्ष, भूमाता ब्रिगेड