भेलोशीच्या एकजुटीचा त्रिवेणी संगम

पोलीस लेकींच्या स्वागतासाठी महाडकर सरसावले

| महाड | प्रतिनिधी |

भेलोशी ग्रामस्थांच्या एकीचे, सुसंस्कृतपणाचे आणि कृतज्ञतेचे दर्शन घडवणारा एक अभूतपूर्व संयुक्त सोहळा नुकताच भेलोशी गावात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून पोलीस भरतीसाठी उतरलेल्या हजारो उमेदवारांमधून, आपल्या भेलोशी या अत्यंत दुर्गम भागातून मुंबई पोलीस दलात भरती होण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या गावच्या रणरागिणींचा गावकऱ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. भेलोशी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, मुंबई मंडळ, समृद्ध ग्राम उत्कर्ष मंडळ, वेद प्रतिष्ठान व सोमजाई नृत्यकला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या ऐतिहासिक यशाबद्दल बोलताना नवनियुक्त महिला पोलीस सेजल यादव हिने, मोबाईल आणि सोशल मीडियाचा मोह टाळून, आई-वडिलांचे कष्ट आणि कुटुंबाच्या पाठींब्यामुळेच आज मी माझ्या स्वप्नाला गवसणी घालू शकले, अशी भावना व्यक्त केली. तर, अस्मिता रेवाळे (बैकर) हिने, प्रतिकूल परिस्थिती आणि लोकांच्या टीकेवर मात करत, पतीच्या खंबीर साथीने मी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले; भेलोशी गावाने ज्या जिव्हाळ्याने माझ्या यशाचे कौतुक केले, त्याने माझे मन भारावून गेले असून, मला या गावाची कन्या असल्याचा अभिमान वाटतो, असे मत व्यक्त केले.

याच सोहळ्याचे दुहेरी औचित्य साधत, आपल्या आयुष्यातील जवळपास 50हून अधिक वर्षांचा काळ गावच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि शैक्षणिक प्रगतीसाठी समर्पित करणारे गावचे उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्व नारायण गोडांबे (गोडांबे गुरुजी) यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा भावपूर्ण अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृतज्ञता व्यक्त करताना गोडांबे गुरुजी म्हणाले की, “माझा अमृतमहोत्सव साजरा करण्यापेक्षा, गावातील दोन लेकींचा पोलीस दलात भरती झाल्याबद्दल होणारा सत्कार माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. म्हणूनच मी या कार्यक्रमाला होकार दिला. प्राथमिक शिक्षणानंतर मुले मुंबईला हॉटेलात कामाला जाण्याचे चित्र बदलण्यासाठी आम्ही 1983 मध्ये गावात हायस्कूल सुरू केले. आज तीच मुले वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करत आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे, असे ते म्हणाले.

तसेच, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले पोलादपूरचे पोलीस हवालदार सारंगे यांनी, पोलीस भरतीचा प्रवास खडतर असून, वाचनात सातत्य ठेवा; जिथे आपण दमतो तिथूनच खरा स्टॅमिना दाखवायचा असतो, असा कानमंत्र देत गावात वाचनालय सुरू करण्याचे व प्रशासकीय मार्गदर्शन शिबीर घेण्याचे आवाहन केले. गोरेगावचे पोलीस हवालदार अभिषेक कदम यांनी, भेलोशी गावाच्या सुशिक्षित आणि तंटामुक्त वातावरणाचा गौरव करत, नवनियुक्त महिला पोलिसांनी गोरगरिबांना न्याय देण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी, असे सांगितले.

या सोहळ्याला महाड शहरचे पोलीस हवालदार मनिष भोईर, अश्विनी घरटकर, रियान देशमुख, जमीर देशमुख, शितल विचारे, मुख्याध्यापक राजेंद्र बनसोडे, अनंत रेशीम, नामदेव नाकते, कृष्णा सुकुम, बबन जाबडे, मनोज निर्मळ, सुमित तुपट, सरपंच वर्षा पवार, बौद्धवाडीचे अध्यक्ष देविदास पवार, प्रफुल्ल पवार, समृद्ध ग्राम उत्कर्ष मंडळ सरचिटणीस संतोष धारशे, दगडू रेवाळे, वेद प्रतिष्ठान अध्यक्षा मधुरा गोडांबे आणि श्रीरंग राहटवळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version